कोपरगाव तालुक्यातील येसगाव जवळ बसने कारला कट मारला या रागातून कारचालकाने बस चालकास बसमध्ये घुसून मारहाण केली. या झटापटीत चालकाच्या गळ्यातील दिडग्रॅम वजनाचे सोन्याचे पान गहाळ झाले. त्यानंतर सदर कार चालकावर कोपरगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडित बसचालक समाधान बद्रीनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोपरगांवकडून येवला मार्गे नांदगावकडे जात असताना येसगाव शिवारातील जिओ पेट्रोल पंपाजवळ दुपारी 4.50 वाजता आले असता. पेट्रोल पंपाकडून अचानक एक गाडी रोडवर आल्याने त्यांनी गाडीला कट मारून बस येवला दिशेने पुढे घेतली. त्यानंतर चालक किरण अण्णासाहेब वराडे यांनी त्यांची गाडी एसटी बसला आडवी लावली व खाली उतरून बाचाबाच करायला सुरुवात केली. तसेच ड्रायव्हर सीटवरून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत माझ्या गळ्यातील दिड ग्रॅम सोन्याचे पान पडून गहाळ झाले. सदर घटना घडल्यानंतर कोपरगाव आगार व्यवस्थापक अनोल बनकर, सहाय्यक वाहतूक अधिक्षक योगेश दिघे अशांसमवेत ग्रामीण पोलीस ठाण्यात जावून कारचालकाविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 126 (2),132, 121(1) 324(4) 352 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई महेश कुसारे पुढील तपास करीत आहेत.