बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू असून आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलक जाळपोळ, लुटमार करत आहेत. अशातच बांगलादेशच्या शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर संतप्त जमावाने सोमवारी दुपारी ढाकाच्या धानमंडी 32 मध्ये असलेल्या प्रसिद्ध हिंदू गायक राहुल आनंद यांच्या घरावर हल्ला केला आहे. त्यांच्या घरात घुसून लुटमारी केली आणि घराला आग लावल्याची घटना घडली आहे.
गायक आनंद राहुल, त्यांची पत्नी आणि मुलगा हल्ल्यादरम्यान सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र हल्लेखोरांनी गायकाच्या घरातून हाताला मिळेल ते सामान चोरले आणि घराला आग लावली. आगीत आनंद यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंशिवाय 3 हजारांहून अधिक हस्तनिर्मित संगीत वाद्य यंत्रांचा मोठा संग्रही होता, तो जळून राख झाला.
राहुल आनंद यांचे घर धानमंडी 32 येथे आहे. आंदोलकांनी त्यांच्या 140 वर्षे जुन्या घराला लुटून आग लावली. आंदोलक घरात घुसण्यापूर्वी आनंद राहुल हे पत्नी आणि मुलासह एक जोड कपडे घेऊन सुरक्षित ठिकाणी गेले. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीव वाचला. पण या घटनेने त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे.