Palghar News: डहाणूत ताडपत्रीखालीच मृतदेहाला भडाग्नी; गद्दार खोके सरकारचा विकास सरणावर, स्मशानभूमी नसल्याने धो धो पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार

विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्पात हजारो कोटींच्या विकासकामांचा पेटारा उघडणाऱया खोके सरकारला अजूनही ग्रामीण भागात रस्ते, आरोग्य इतकेच नाही तर साधी स्मशानभूमीदेखील देता आलेली नाही. मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील डहाणूच्या अनेक गावपाडय़ांवर स्मशानभूमी नसल्याने धो धो पावसात उघडय़ावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

गावकऱयांनी हातात ताडपत्री धरून भडाग्नी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून खोके सरकारचा विकास ग्रामीण भागात सरणावरच चढल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

सरकार दरवर्षी अर्थसंकल्पात आदिवासींसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करते. परंतु मायानगरी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर व रायगड जिह्यातील आदिवासीपाडय़ांवर जायला साधे रस्तेही नाहीत. अनेक ठिकाणी विजेची बोंब असल्याने स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही गोरगरीबांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. गर्भवती माता, रुग्णांना डोली करून दऱया-खोऱया तुडवत नातेवाईकांना रुग्णालय गाठावे लागत आहे. तर पुठे दुथडी भरून वाहणाऱया नद्यांमधून विद्यार्थी, ग्रामस्थ ये-जा करीत असल्याचे सध्या दिसत आहे. यावरून सरकारच्या नाकर्तेपणावर टीकेची झोड उठत असतानाच डहाणू तालुक्यातील सोनाळे येथील खुबरोडपाडय़ात हातात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार उरकल्याचे उघड झाले आहे.

मरणानंतरही नरकयातनाच

खुबरोडपाडा येथील जयराम झिरवा (55) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. स्मशानभूमी नसल्याने उघडय़ावरच चिता रचून त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. मात्र त्याचवेळी धो धो पाऊस सुरू झाला आणि पेटलेली चिता विझू लागली. त्यामुळे तारांबळ उडालेल्या गावकऱयांनी सरणावर ताडपत्री धरून अंत्यसंस्कार उरकला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आदिवासींना मरणानंतरही नरकयातना भोगाव्या लागत आहेत, असा संताप व्यक्त होत आहे.