सांगली शहरालगत असलेल्या हरिपूरमधील दोन बंगले मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. तब्बल 40 तोळे सोन्यासह दोन लाखांची रोकड लंपास केली. सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यासोबत परिसरातील दोन मंदिरांतही चोरीचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हरिपूर परिसरातील विस्तारित भागात गेल्या महिनाभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रदीपकुमर अडसूळ (रा. सुमंगल पार्क, हरिपूर) यांनी फिर्याद दिली.
प्रशांत अडसूळ यांचा सुमंगल पार्क येथे ‘पॅराडाइज’ नावाचा बंगला आहे. त्यांचे वडील प्रदीपकुमार आजारी असल्याने ते बंगल्यास कुलूप लावून रात्री रुग्णालयात गेले होते. मध्यरात्री दोन ते तीन चोरट्यांनी अडसूळ यांचा बंगल्याचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. आतील लोखंडी कपाटातील 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, तसेच रोख दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील आणखी एक बंगला फोडला. तेथून सोन्याची अंगठी लंपास केली; पण त्याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात आली नव्हती.
दोन बंगले फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गोंदवलेकर महाराज मठ आणि गजानन महाराज मंदिराकडे वळविला. येथेही चोरीचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. तेथून चोरटे पसार झाले. सकाळी नऊ वाजता अडसूळ घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. श्वान पथक, ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या.