
गेले 15 दिवस सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने तुळशी प्रकल्पाचा संरक्षक कठडा ढासळला आहे. अनेक ठिकाणी तो ढासळण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मुख्य दरवाजावरील सिमेंटचे संरक्षक कठडेही कमकुवत झाले आहेत. या पडझडीकडे पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राधानगरी आणि करवीर तालुक्यांतील सुमारे 50हून अधिक गावांची जीवनदायिनी असलेला तुळशी प्रकल्प 2026ला 50व्या वर्षात पदार्पण करीत अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या वर्षी प्रकल्पास 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षांत या प्रकल्पाची देखभाल-दुरुस्ती करून संवर्धन करणे गरजेचे असतानाही पाटबंधारे विभागाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.
सन 1965ला काम सुरू होऊन 1976ला बांधकाम पूर्ण झालेल्या प्रकल्पास या वर्षी 48 वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाचे मुख्य दरवाजाचे काम सिमेंट काँक्रीटमध्ये असून, उर्वरित तीन किलोमीटरची भिंत मातीची आहे. या भिंतीवर बांधलेल्या दगडी बांधकामातील संरक्षक कठड्याचे बांधकाम ठिसूळ झाले आहे, तर मुख्य वक्र दरवाजावर बांधलेल्या कठड्यांचेही सिमेंट काँक्रीट निघाले असून, आतील लोखंडी सळया, स्टील उघड्या पडून गंजू लागल्या आहेत. हा कठडा तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन शाखा अभियंता विजय आंबोळे यांनी संरक्षक कठड्याच्या नूतनीकरणासाठी जाहीर निविदा काढली होती; पण त्यांची बदली झाली आणि दुरुस्तीचा विषयही थांबला. त्यानंतर आलेल्या दोन शाखा अभियंत्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता तर पडझडीस सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाने तत्काळ याची दखल घेऊन लागणाऱ्या सर्व बांधकामांचे नूतनीकरण करून प्रकल्पाचे संवर्धन करावे, अशी मागणी तुळशी नदीकाठच्या गावांतून होत आहे.
‘पाटबंधारे’चे अधिकारी काय करतात? नागरिकांचा सवाल
अनेक वेळा धरणाच्या करंट रिपेअरसाठी पाटबंधारे विभागाकडून निविदा काढून निधी लावला जातो. यासाठी संबंधित उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांनी धरणाचे सर्वेक्षण करून वरिष्ठ कार्यालयाकडे रिपोर्टिंग करायचे असते. मग तत्कालीन शाखा अभियंता विजय आंबोळे यांचा अपवाद वगळता, बाकीचे अधिकारी काय करीत आहेत? असा सवाल नागरिक करीत आहेत.
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ही बाब अतिशय गंभीर आहे. यावर ठोस उपाययोजना न केल्यास तुळशी नदीकाठची जनता तीव्र आंदोलन उभारेल.
– रेश्मा नवणे, सरपंच, धामोड
प्रकल्पासाठी 24 तास वेळ देऊन उभ्या पावसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करून प्रकल्पाच्या संवर्धनाचा विडा उचललेले तत्कालीन अभियंता विजय आंबोळे यांच्यासारख्या अभियंत्यांची गरज सध्या तुळशी प्रकल्पास आहे.
– कृष्णात इंगवले, पोलीस पाटील, तुळशी धरणग्रस्त अध्यक्ष, बुरंबाळी