माजी संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविणार, नगर अर्बन बँक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांच्या हालचाली

नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत. यासंदर्भात पोलिसांकडे सादर झालेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून संबंधित उपनिबंधक कार्यालयास या जमिनींची खरेदी होऊ नये यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना एक अहवाल पाठविण्यात येणार असून, त्यानंतर संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे.

नगर अर्बन बँकेतील तब्बल 291 कोटींच्या गैरव्यवहाराबाबत कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल आहे. आर्थिक अनियमिततेमुळे अर्बन बँक अडचणीत आल्याने अवसायनात गेली आहे. या बँकेत 800 कोटींच्या पुढे घोटाळा निष्पन्न झाला आहे. त्यामुळे या बँकेच्या 2014 ते 2019 या कार्यकाळातील संचालक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यावर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. दरम्यान, आर्थिक घोटाळाप्रकरणी आतापर्यंत बँकेचे माजी चेअरमन अशोक कटारिया यांच्यासह 10 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील अनेक संचालक फरार आहेत. या गुन्ह्यात बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असून, काहींना अटक झाली आहे, तर अनेकांवर अटकेची टांगती तलवार आहे.  अर्बन बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

फरार आरोपीने जमीन काढली विक्रीला

अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील एक संशयित फरार असून, त्याने पतसंस्थेतील वादग्रस्त भावाच्या माध्यमातून एक एकर सात गुंठे जमीन विक्रीसाठी काढली आहे. त्यासाठीची वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पोलिसांनी हा व्यवहार हाणून पाडावा, असे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 104 जणांचा सहभाग

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये बँकेचे संचालक, अधिकाऱ्यांसह थकीत कर्जदार अशा तब्बल 104 जणांचा घोटाळ्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. अटकेतील आणि फरार आरोपींच्या मालमत्तांची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. याच्या आधारे त्यांनी उपनिबंधक कार्यालयाला कळविले असून, या मालमत्तांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार रोखण्यास सांगितले आहे. या सर्व मालमत्तांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्यानंतर या मालमत्तांवर बोजा चढविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी हालचाली सुरू आहेत.