उद्यापासून सोलापूर जिह्यामधून मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली सुरू होत आहे. मराठा समाजाने एक दिवस काम बंद ठेवून समाजासाठी द्यावा. सगळ्य़ांनी काम सोडून आपल्या जिह्यातील रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केले. यानंतर मुंबई, कोकणचादेखील दौरा करणार आहोत. शिवाय इथेही आम्ही बैठका घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. शांतता रॅलीची पश्चिम महाराष्ट्रात दुसऱया टप्प्याची सुरुवात करून 7 ऑगस्ट सोलापूर, 8 सांगली, 9 कोल्हापूर, 10 सातारा, 11 पुणे, 12 नगर व 13 रोजी नाशिक येथे समारोप होणार आहे. त्यानंतर कोकण व विदर्भ दौरा करणार असल्याचे सांगितले.
भाजप मराठवाड्य़ात मिशन सुरू करणार आहे. त्यासंदर्भात जरांगे पाटील त्यांच्या मिशनवर टीका करताना म्हणाले, भाजपचे आरक्षण न देण्यासाठी मिशन सुरू आहे. ते मराठय़ांना, मुस्लिमांना छळत आहेत. मिशन काढूनही यांना मतदान होणार नाही. गोरगरीब शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी मिशन नाही काढणार. केवळ यांना मोठे होण्यासाठी व सत्तेत येण्यासाठी आमदार निवडून आणण्यासाठी हे मिशन आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.