आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने वसूल केले 24 हजार कोटी; जीएसटीवरून विरोधकांनी सरकारला घेरले

आरोग्य विम्याच्या हप्त्यातून सरकारने तब्बल 24 हजार कोटी वसूल केल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.  आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यावरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याची मागणीही त्यांच्यासह विरोधकांनी केंद्र सरकारकडे लावून धरली. आज विरोधकांनी संसदेबाहेर जोरदार आंदोलन केले. संसद भवनाच्या मकर गेटसमोर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदारांनी जीएसटी मागे घेण्याची मागणी केली आहे.  केंद्र सरकारने आरोग्य विमा आणि जीवन विम्यावर वाढवलेला जीएसटी मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षाने संसदेबाहेर आंदोलन केले.  काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार आंदोलनात सहभागी झाले. भाजप सरकारच्या असंवेदनशील विचारसरणीचा हा पुरावा असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

कोटय़वधी सामान्य हिंदुस्थानींकडून मोदी सरकारने 24 हजार कोटी गोळा केले. प्रत्येक आपत्तीपूर्व कर गोळा करण्याची संधी शोघणे हा भाजप सरकारच्या असंवेदनशील विचारसरणीचा पुरावा आहे, असे राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.