<<< द्वारकानाथ संझगिरी
‘पदक थोडक्यात हुकलं’, हे वाक्य ऑलिंपिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंच्या बाबतीत अनेकदा ऐकायला येतं. आपण तर निराश होतोच; पण खेळाडूंचं काय होत असेल? कारण बऱ्याचदा मेडल आणि चौथा नंबर हे अंतर अत्यंत कमी असतं. म्हणजे बोटांना पदकाचा स्पर्श होतोय असं वाटत असताना तो स्पर्श नियती खेचून घेऊन जाते. मग तो स्पर्श करण्यासाठी चार वर्षे वाट पाहावी लागते. प्रचंड मेहनत करायला लागते, स्टॅमिना टिकवावा लागतो, मोटिव्हेशन टिकवावं लागतं. लग्नाप्रमाणे पदकांच्या बाबतीत शेवटच्या अक्षता पडणं हीच पदक मिळण्याची गरज. मंगलाष्टकं सुरू असताना आशा असू शकते; पण खात्री नाही. इतकं हे ऑलिंपिकचे जग क्षणभंगुर आहे. आजपर्यंत अनेक हिंदुस्थानी खेळाडूंनी दुःख पचवलं आहे. मग चौथा येणारा मिल्खा सिंग असो, पी. टी. उषा असो किंवा अगदी परवा तिसरं कांस्यपदक डोळ्यासमोर दिसत असताना चौथ्या स्थानावर फेकली गेलेली मनू भाकर असो किंवा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन असो. दोन कांस्यपदक जिंकल्यावर मनूला तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर काळा तीळ अजिबात नको होता. त्याशिवाय तिचं हसणं अधिक फुललं असतं. तिने हसरा चेहरा ठेवला; पण तरीही त्यामागची दुखरी छटा नक्कीच दिसली. नियतीने तिच्या पुढच्या कारकीर्दीला दृष्ट लागू नये म्हणून लावलेलं ते काळं तीट होतं का? असेलही; पण त्या क्षणी ते नको होतं.
तो शेवटचा क्षण आपला करणं हे खूप गोष्टींवर अवलंबून असतं. त्यात मानसिक ताकद ही सर्वात मोठी. अचूकता ही कधी कधी मानसिक ताकद कमी झाल्याने कमी होऊ शकते. कधी कधी नशीबच साथ देत नाही. कधी कधी इतर सर्व गोष्टी बरोबर असताना काही तांत्रिक चूक होऊ शकते. काही वेळा तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षा खूप चांगला खेळतो. आपला खेळ तो उंचावतो. त्यामुळे तो क्षण हा सर्वात सोनेरी क्षण असतो. जो तो क्षण गमावतो त्याला त्याचं दुःख कळतं. आत्मविश्वास, मानसिक ताकद या गोष्टी खरंच वैयक्तिक असतात का, असं कधी कधी मला वाटतं. विशेषतः तो तुमच्या स्वभावाचा भाग असतो का?
सुनील गावसकर फलंदाजीला जाताना पंधरा ते वीस मिनिटं कुणाशीही बोलत नसे. तो फक्त त्याची एकाग्रता वाढवत असे. तो त्याच्या ‘झोन’मध्ये असे. त्याच्या उलट सेहवाग. फलंदाजीला जाताना प्रेयसीला भेटायला जावा त्या मूडमध्ये जातोय असं वाटायचं. प्रत्येक खेळाडूची डोक्यावर असणाऱ्या दबावाशी सामना करायची पद्धत वेगळी. विव्ह रिचर्ड्स मोठ्या स्टेजवर स्वतःला समजवायचा की, मी या स्टेजचा राजा आहे. इतर मंडळी आता नर्व्हस झाली असतील, त्यामुळे मला सर्व भार घेऊन परफॉर्मन्स द्यायचा आहे हा उद्दामपणा नसतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची एक पद्धत आहे. क्रिकेटमध्ये 99 आणि 100 मध्ये जो फरक आहे तोच फरक ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक आणि चौथा क्रमांक यात आहे. 99 विसरला जातो. शतक कायम स्मरणात राहतं. काही खेळाडू कदाचित दबावापासून दूर जाण्याचा वेगळा प्रयत्न करत असतील किंवा नेहमीसारखा क्षण आहे असेही मानत त्यांच्या डोक्यावरचा दबाव कमी करत असतील.
पाकिस्तानमध्ये सेहवाग जेव्हा 300च्या दरवाजावर होता तेव्हा नुसती त्यांनी बेल वाजवली असती तरी दरवाजा उघडला असता, मात्र त्याला तो धाडकन् षटकार ठोकून उघडावा असं वाटलं. याला आत्मविश्वास म्हणायचं, प्रचंड मोठं मानसिक धैर्य म्हणायचं की तो क्षण एकदा संपवून टाकायचा आणि दबावामधून मोकळं व्हायचं, हा प्रयत्न समजायचा की तो स्वभाव समजायचा.
परवा पॅरिस ऑलिंपिकला तुर्कस्तानच्या 52 वर्षांच्या डिकेक युसूफ नावाच्या मोटर मेपॅनिकने पिस्तूल शूटिंगमध्ये रौप्यपदक मिळवलं. त्याला शूटिंगमध्ये अजिबात करीअर वगैरे करायचं नव्हतं. मुलांबरोबर वीपेंड घालवण्यासाठी त्याने एक नवा चाळा शोधला. हौशी रेंजवर जाऊन त्याने हातात पिस्तूल घेतलं आणि त्याच्या लक्षात आलं की, तो रॉबिन हूडचा नेम घेऊन जन्माला आला आहे.
बरं, रौप्यपदक मिळवण्यासाठी तो काही खास ट्रेनिंग करत असेल, खेळाला आयुष्य वाहत असेल तर तसं काहीही नाही. शूटिंग रेंजमध्ये सरावाला तो गेल्यानंतर व्यावसायिक शूटर्स त्याचा नेम पाहून वेडे होत. कुठलाही गिअर किंवा विशेष कपडे त्याने वापरले नाही. त्याचा ड्रेस म्हणजे जीन्स आणि वर टी-शर्ट. सराव झाला की तो व्यावसायिक शूटरांना फक्त विचारायचा, ‘इथे स्मोकिंग एरिया कुठे आहे?’ रौप्यपदक घेताना त्याचा चेहरा निर्विकार होता. आपण काहीतरी मोठं केलंय असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. फक्त त्या मंचावर उभे राहून आपल्या घटस्फोट दिलेल्या बायकोला उद्देशून तो म्हणाला, ‘तू जर हे पाहत असशील, तर माझे एक काम कर. माझा कुत्रा मला परत दे.’ कुठला सोनेरी क्षण? कुठला दबाव? तो देवाकडून एक वेगळीच गुणवत्ता घेऊन आला. ती त्याला अचानक गवसली आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर ऑलिंपिकमध्ये आला. त्याचं यश पाहून इतर ‘घासू विद्यार्थी’ अचंबित झाले. पण ती देवाची करणी होती. प्रत्येक शूटर तसा नसतो. मला अशावेळी किशोर कुमारची आठवण येते. तो कुठलं गाणं शिकला? तो कुठला राग गायचा? बस, त्याला एकदा गाणं शिकवलं, त्याने सराव केला की तो असा गायचा की, रियाजी गायक वेडे होत. पण आपण एकच लक्षात ठेवायचं की, अशी माणसं अपवाद असतात. पदक मिळवण्यासाठी ‘घासू विद्यार्थी’ होणं हेच योग्य!