मढीतील जलजीवन मिशनचे काम तातडीने पूर्ण करा; ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील जलजीवन मिशन योजनेतंर्गत सुरु असलेले काम तातडीने पूर्ण करावे. तसेच मढी ते तिसगाव या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी मंगळवारी मढी येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या दारासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व मढीचे सरपंच संजय मरकड यांनी केले. या मागण्यांवर अधिकाऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मढी येथे गेल्या अनेक दिवसांपासून जलजीवन मिशन योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र, ते अद्यापही पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच तिसगाव ते मढी या बाराशे मीटर रस्त्याचे काम नुकतेच झाले असून हे काम निकृष्ट झाल्याचा मढी ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत सरपंच मरकड यांच्यासह माजी सरपंच देविदास मरकड, भाऊसाहेब निमसे, बाळासाहेब मरकड, बाबासाहेब मरकड, राजेंद्र मरकड, उत्तम मरकड, शामराव मरकड, रवींद्र मरकड, मुरलीधर मरकड यांनी पंचायत समितीच्या दारासमोर धरणे आंदोलन केले.

संजय मरकड म्हणाले की, गावात सुरु असलेल्या पाणी योजनेचे काम रखडल्याने ग्रामस्थांना पाणी कुठून आणावे असा प्रश्न पडला आहे. ही योजना पूर्ण करावी अशी अनेकवेळा मागणी करूनही उपयोग होत नाही. मढी ते तिसगाव हा रस्ता करण्यात आला आहे. त्याचे काम अत्यंत निकृष्ठ झाले असून आताच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या विषयावर ग्रामसभेत चर्चा सुद्धा झाली असून सर्व ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाविषयी तक्रारी केल्या आहेत. या रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करावी व पाणीयोजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. या आंदोलनाची दखल पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिल सानप यांनी घेतली. ते आंदोलस्थळी आले व त्यांनी या योजनेसाठी आधी बक्षिसपत्र देण्यात आले आहे, त्याऐवजी दुसऱ्या जागेचे बक्षिसपत्र ग्रामपंचायतीने दिल्यास तातडीने या योजनेचे काम पूर्ण केले जाईल. तसेच रस्त्याबाबत बांधकाम विभागातील अधिकारी उमेश केकाण यांनी मोबाईलवरून आंदोलकांशी संवाद साधत या रस्त्याच्या कामाची 15 दिवसात पाहणी करून हा रस्ता दुरुस्त करून दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.