बांगलादेशातील स्थिती भयावह, अल्पसंख्यांकांवर आणि मंदिरांवर हल्ले; अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेशात प्रचंड राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती नेत्यांना दिली. त्यासोबतच सरकारची भूमिकाही सर्वपक्षीयांना स्पष्ट केली. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देश महत्त्वाचा अशा प्रसंगी राजकारण नाही. आम्ही सरकारसोबत आहोत, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

हा संपूर्ण देशाचा विषय आहे. या संबंधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सकाळी सर्वपक्षीय बैठकही घेतली होती. देश म्हणून आम्ही सरकारच्या सोबत आहोत. यात आम्ही राजकारण करणार नाही. देश म्हणून आम्ही ठामपणे उभे राहू. बांगलादेशातील स्थिती भयावह आहे. तिथे अल्पसंख्यांकांवर आणि मंदिरांवर हल्ले होत आहेत. हा एक मुद्दा आहे. तसेच सीमेतून देशात घुसखोरी होत नाहीये ना? यामुळे सीमेवरील सुरक्षा वाढवावी लागले. तिथे नवीन सरकार स्थापन होईल ना होईल, हे सर्व विषय आहेत. यामुळे एक-दोन दिवसांच्या घडामोडींवर भाष्य करणं योग्य नाही, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

सर्वप्रथम बांगलादेशात कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तिथे प्रयत्न सुरू आहे. दोन्ही देशांच्या सैन्यात समन्वय साधून चर्चा होत आहेत. तसेच पंतप्रधानपदावरून पायउतार होऊन तिथल्या नेत्या आपल्या देशात आल्या आहेत. त्यांनाही धक्का बसला आहे. यावेळी त्यांच्याशी इतर राजनैतिक चर्चा करणं योग्य नाही. धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. त्याचे पडसाद देशात उमटू नये, याची खबरदारी सरकारने घ्यावी, असे आम्ही परराष्ट्रमंत्र्यांना सांगितले. ही त्या देशातील घटना आहे. असं काही होणार नाही. लवकरच स्थिती निवळेल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.