जालन्यातील जिओ व एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरमधील बॅटर्या चोरी करणार्या टोळीच्या मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीम उर्फ गुड्डु शेख खाजा, शेख हसन शेख मोहसीन, शुभम अशोक फतरे, राहुल उर्फ सुनील संजय मेहेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जालना शहरासह जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून जिओ व एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरमधील बॅटरी चोरीच्या घटना वाढत होत्या. चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने 31 जुलै रोजी रात्रगस्तीवरील अंमलदार सहायक फौजदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार शैलेंद्र आडेकर व धोंडीराम वाघमारे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी जालना ते मंठा हायवे रोडलगत सोलगव्हाण पाटीजवळील धानोरा शेत शिवार अंतर्गत येणार्या शेतात असलेल्या एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरजवळ काही आरोपींच्या संशयास्पद हालचाली दिसल्या.
सदर ठिकाणी पोलीस अंमलदार वाघमारे यांनी टॉर्चचा उजेड त्यांच्या दिशेने मारला असता ते चोरटे त्यांच्या वाहनात बसून तेथून पळाले.पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग केला. उटवद येथील पेट्रोलपंपासमोर संशयित आरोपींची गाडी अडवली. गाडीची तपासणी केली असता आत चोरीसाठी लागणारे साहित्य आढळून आले. यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आरोपींची सखोल चौकशी केली असता त्यांनी जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोबाईल टॉवरवरील बॅटर्या चोरीचे गुन्हे केलेले असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. यानंतर आरोपींसह चोरी केलेला मुद्देमाल खरेदी करणारे त्यांचे सहकारी नवाब ईमाम शहा, मोहम्मद अमीरोद्दीन अब्दुल गफ्फार यांच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींकडून विविध गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल मोबाईल टॉवरच्या बॅटर्या, गुन्ह्यात वापरलेले वाहन, आरोपींचे मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, सहायक फौजदार प्रकाश जाधव, संतोष धायडे, ज्ञानोबा बिरादार, पोहेकॉ मच्छिद्र वाघ, राजेंद्र देशमुख, दिलीप गोडबोले, नितीन खरात, नामदेव जाधव, भगवान खरात, दादासाहेब हरणे, नितीन कोकणे, धोंडीराम वाघमारे, शैलेंद्र आडेकर, प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के, सदाशिव खैरे, विनोद इंगळे यांनी केली.