समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव सध्या चर्चेत आले आहेत. इन्स्टाग्रामवरील रिल्स बनवणाऱ्यांविरोधात त्यांनी राज्यसभेत आवाज उठविला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर रिल्स करणाऱ्या तरुणाईवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत इन्स्टाग्रामच्या रिल्सचे प्रचंड क्रेझ वाढले आहे. आजची तरुण पिढी दिवसातले तीन तास इन्स्टाग्राम रील्स बनविण्यासाठी आणि बघण्यात वेळ घालवत आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स जे बनवितात ते असे कपडे घालतात की शरमेने नजर खाली जाते, असा संताप व्यक्त केला आहे.
जर कोणत्याही समाजात न्यूडिटी आणि मद्यपानाला प्रोत्साहन दिले तर त्याने सभ्यता आणि संस्कृती नष्ट होते. आज अनेक माध्यमं अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. विशेष करुन इन्स्टाग्राम तरुणांची दिशाभूल करत आहे. आज तरुण पिढी किमान तीन तास इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्यात वेळ घालवते. त्यावर अश्लील कार्यक्रम पाहिले जातात. अश्लीलता रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहेत, अशी विनंती सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली.
लोक सोशल मीडियावर काहीही लिहितात. पंतप्रधानांपासून विरोधी पक्षनेत्यापर्यंत सर्वांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली जाते. सोशल मीडियावरील अशा कमेंट्स रोखण्यासाठी आता कठोर कायद्याची गरज असल्याचे आपचे खासदार विक्रमजीत म्हणाले.