बांगलादेशातील हिंसाचारावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली चिंता

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात अराजकता निर्माण झाली आहे. तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. तिथल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेख हसीना या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन हिंदुस्थानात आल्या आहेत. दरम्यान, बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंबाबत चिंता व्यक्त होत आहे. ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी बांगलादेशच्या सैन्याला तेथील हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बांगलादेशच्या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. आपल्या शेजारील देश बांगलादेशात राजकीय उलथापालथ झाली आहे. तेथील सैन्य लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी योग्य तऱ्हेरेने पार पाडतील. आमचे 10 टक्के हिंदू बांधव बांगलादेशात राहतात. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे आमच्या हिंदू जनतेचे रक्षण करा, अशी तेथील सैन्याला आमची विनंती आहे, असे अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. बांग्लादेशात राहणारे हिंदू तुमच्या देशाचे नागरिक आहेत आाणि प्रत्येक नागरिकासाठी एकाच प्रकारची व्यवस्था, सुविधा आणि व्यवहार आवश्यक आहे. त्यामुळे तिथल्या हिंदूंनी परिस्थितीनुसार धैर्य राखत आपले संरक्षण करावे. शिवाय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्या, असे आवाहन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद केले आहे.