मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका स्टॅम्पपेपरवरून हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली आहे. हा स्टॅम्पपेपर ग्वाल्हेरमधील अचलेश्वर महादेव मंदिराच्या दानपेटीत आढळून आला आहे. दरम्यान दानपेटीत पत्र आल्यानंतर खळबळ उडाली असून याबाबतची माहिती मिळताच पुजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
ग्वाल्हेरधील अचलेश्वर या शिवमंदिरातील दानपेटीत मिळालेल्या दानाची मोजणी सुरू होती. यावेळी दानपेटीत नेहमीप्रमाणे पैशांबरोबरच दागिने आणि इतर वस्तू सापडल्या. दरम्यान काही लोकांनी आपल्या इच्छा पूर्ण झाल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी अनेक पत्रेही लिहिली होती. यातील एक पत्र असे होते की त्यामुळे मंदिरात एकच खळबळ उडाली.
दानपेटीतील पत्रामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. माझे पुढील लक्ष्य मुंबईतील मुकेश धीरूभाई अंबानी हे आहेत, असे त्या 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहिले होते. यावर धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव देखील लिहिले असून मनोज शर्मा असे त्याचे नाव आहे. आरोपी हे पेशाने वकील असून त्यांने यापूर्वीही अशाच प्रकारचे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पोलीस या प्रकरणाची कसून चोकशी करत आहेत.
कोण आहे मनोज शर्मा-
मनोज शर्मा हे एक प्रसिद्ध नाव असून ते पेशाने वकील आहेत. 2014 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय यांच्यावर काळी शाई फेकून मनोज शर्मा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दरम्यान, मनोज यांच्यावर 11 गुन्हेही प्रलंबित असून, त्यात इन्स्पेक्टरकडून पिस्तूल पळवणे, खुनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.