Paris Olympic 2024 : बीडच्या पठ्ठ्याने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, अविनाश साबळेची स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत धडक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या दहाव्या दिवसापर्यंत हिंदुस्थानच्या खात्यात तीन पदके जमा झाली आहेत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धावपटू अविनाश साबळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नवा इतिहास रचला आहे. 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला हिंदुस्थानी ठरला आहे.

3000 मीटर स्टीपलचेज अविनाश साबळे अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला आहे. नॅशनल रेकॉर्ड होल्डर अविनाश साबळे याने दुसऱ्या हिटमध्ये 8 मिनीट 15.43 वेळ घेऊन स्पर्धा जिंकली. तीन हीटमध्ये पाचव्या स्थानावर राहिलेल्या धावपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आता तो 8 ऑगस्टला अंतिम सामना खेळणार आहे.

हिंदुस्थानी धावपटूच्या हीटला मोरोक्कोच्या मोहम्मद टिंडौफतने 8 मिनिटे 10.62 सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावला. अविनाश साबळेने हीट्सच्या सुरुवातीला एका लॅपमध्ये प्रथम स्थानावर शर्यत सुरू केली, मात्र केनियाच्या ॲथलीट अब्राहम किरीवोटने त्याला सहज मागे टाकले. हळूहळू साबळे पाचव्या स्थानावर आला, हे स्थान कायम राखत हिंदुस्थानी खेळाडूने आरामात अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.