गिरगावात आज भररस्त्यात पतीने पत्नीवर कटर ब्लेडने जीवघेणा हल्ला गेला. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली. पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गिरगावच्या खाडिलकर रोडवर हा थरार झाला. सागर आणि शीतल बेलोसे असे त्या पती-पत्नीचे नाव आहे. दोघेही विरारला राहतात. शीतल ही गिरगावात एका दुकानात कामाला आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी खाडिलकर मार्गावर आली. सागर आधीपासून तिची वाट बघत बसला होता. शीतल येताच त्यांच्यात वाद झाला. सागरने कटर ब्लेडने तिच्या मानेवर वार करायला सुरुवात केली.
शीतल सागरवर संशय घ्यायची. त्यातून दोघांमध्ये वाद व्हायचे. महिनाभरापूर्वी शीतल माहेरी जाऊन राहू लागली. पण तू परत घरी ये असे सागरचे म्हणणे होते. आज त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र यावेळी कटर घेऊन तयारीत आलेल्या सागरने भररस्त्यात शीतलवर खुनी हल्ला करून मग स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला, असे व्ही. पी. रोड पोलिसांकडून सांगण्यात आले.
युवासेना उपशाखा अधिकाऱयामुळे वाचला जीव
भररस्त्यात पती पत्नीवर कटर ब्लेडने वार करत असताना निरंजन माईण हा 30 वर्षांचा बहाद्दर युवक मदतीला धावला. त्याने सागरच्या तावडीतून शीतलला सोडवले.
निरंजन माईण हा शिवसेना शाखा क्रमांक 218 चा युवासेना उपशाखा अधिकारी आहे. महिलेला वाचविण्यासाठी कुणी पुढे जात नव्हते. त्याचवेळी भाजी आणण्यासाठी तेथे गेलेल्या निरंजनने कसलीही तमा न बाळगता पुढे जाऊन सागरच्या तावडीतून शीतलची सुटका केली. यावेळी सागरचा एक वार निरंजनच्या ओठांवर लागला. सुदैवाने त्यात निरंजनला किरकोळ जखम झाली. निरंजनने हिम्मत दाखवल्यानंतर नागरिकांनी सागरवर झडप घातली. सर्वांनी मिळून सागरला चोप दिला. त्याचवेळी सागरने कटरने स्वतःच्या हाताची नस कापली. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी रक्तबंबाळ झालेल्या दोघांनाही वेगवेगळय़ा इस्पितळात दाखल केले. याप्रकरणी भा.न्या. सं. तेच्या कलम 109 अन्वये सागर बेलोसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.