
पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी ‘दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी’, असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले होते. त्यास नगर शहर व उपनगरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या रविवारी (दि. 4) महापालिकेच्या वतीने नालेगाव परिसरात झिका, डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेत आयुक्त यशवंत डांगे यांनी सहभागी होऊन नागरिकांना डास उत्पत्ती करणारी स्थाने नष्ट करण्याचे आवाहन केले. घर परिसराजवळ कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी वाहते करून द्यावे, फ्रिजचे ट्रे, कुंड्या, पक्ष्यांसाठी ठेवलेले पाण्याचे भांडे, जुने टायर, भंगार वस्तू यामध्ये साचलेल्या पाण्यात एडीस डासांची उत्पत्ती होऊन विषाणूजन्य आजार पसरतात. त्यामुळे सदरचे पाणी तत्काळ वाहते करावे, संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, विकास गीते, सतीश ताठे आदींसह महात्मा फुले आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी अंगणवाडी, आशा सेविका उपस्थित होत्या.
गणेश कवडे म्हणाले, पावसाळ्यात अनेक विषाणूजन्य आजार पसरत असतात. ताप येणे, थंडी वाजून येणे, अंगदुखी, डेंग्यू आदी आजारांना रोखण्यासाठी महापालिका प्रशासन आवश्यक त्या सर्व उपायोजना करीत आहे. औषध व धूर फवारणीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन यावेळी केले.