देखभाल व दुरुस्तीअभावी सातारा जिल्ह्यात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरत आहे. महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्टपर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दयनीय अवस्था, चांगल्या रस्त्यासाठीचा टोल देऊन देखील नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सीईओ याशनी नागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाची अवस्था ‘खड्डे हजार आणि वाहनधारक बेजार’, अशी झाली आहे. या महामार्गावरील प्रवास वाहनधारक आणि प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांची, जीव गमावण्याची किंवा जायबंदी होण्याची टांगती तलवार डोक्यावर आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत; अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही, यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही देसाई यांनी दिल्या.