कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, जिल्ह्यात सुमारे सव्वाअकरा कोटींचे नुकसान

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला असून, पावसाची उघडझाप सुरू होती. तर, गेल्या महिन्यात 25 जुलै रोजी सकाळी उघडलेल्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपैकी तब्बल बारा दिवस सुरू असलेले दोन स्वयंचलित दरवाजे अखेर आज सकाळी बंद झाले. इतर दरवाजे यापूर्वीच टप्प्याटप्प्याने बंद झाले होते. धरणाच्या विद्युतगृहातून आता केवळ 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. शिवाय आठवडाभरापूर्वी 43 फुटांची धोकापातळी ओलांडून 47.11 फुटांवर गेलेल्या पंचगंगेची पाणीपातळी आज सायंकाळी चारच्या सुमारास 40.2 फुटांवर आली होती. अजूनही पंचगंगा 39 फुटांच्या इशारा पातळीवरच आहे.

एकीकडे पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्यातुलनेत पंचगंगेची पाणीपातळी मात्र अजूनही संथगतीने उतरत असल्याचे दिसत आहे. अद्यापही जिह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिह्यातील सार्वजनिक पाटबंधारे व बांधकाम विभागाकडील आठ राज्यमार्ग, 38 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 46 मार्ग बंद आहेत. तर जिल्हा परिषदेचे 15 इतर जिल्हा मार्ग आणि 30 ग्रामीण मार्ग असे एकूण 45 मार्ग बंद आहेत.

सुमारे सव्वाअकरा कोटींचे नुकसान

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची, गोठ्यांची संख्या पाहता सुमारे 11 कोटी 13 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. यामध्ये आतापर्यंत पूर्णतः पडझड झालेल्या 27 पैकी पात्र 11 घरांना 3 लाख, अंशतः 369 पैकी पात्र 41 घरांना 65 हजार, तर 2585 पैकी पात्र 1 हजार 207 कच्च्या घरांच्या नुकसानीस 1 लाख 17 हजारांची शासकीय मदत करण्यात आली आहे. शिवाय 236 बाधित गोठ्यांपैकी पात्र 83 गोठ्यांसाठी 15 हजारांची मदत करण्यात आली आहे. 16 मोठी मृत झालेल्या दुधाळ जनावरांसाठी 5 लाख 65 हजार, 13 लहान मृत दुधाळ जनावरांसाठी 1 लाख 22 हजार, तर ओढकाम करणाऱ्या मोठ्या 2 मृत जनावरांसाठी 1 लाख 20 हजारांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अशाप्रकारे एकूण तब्बल 11 कोटी 13 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. यामध्ये काल झालेल्या 47 खासगी घरांच्या एकूण 15 लाख 26 हजार रुपयांच्या नुकसानीचाही समावेश आहे.