अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या यादीत 90 हजार 400 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. या फेरीसाठी एकूण 1 लाख 97 हजार 648 जागा उपलब्ध होत्या, तर एकूण 1 लाख 3 हजार 154 विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी अर्ज केले होते. एकूण 65 हजार 501 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाले आहे.
ज्या विद्यार्थ्यांस विशेष तिसऱया गुणवत्ता यादी 1 मध्ये कॉलेज अलॉट झाले नसेल अशा विद्यार्थ्यांनी पुढील प्रवेश फेरीसाठी प्रतीक्षा करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्याने अल्पसंख्याक, इनहाऊस किंवा व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेतला असल्यास विद्यार्थी ऑनलाईन प्रवेशाच्या सर्व फेऱयांसाठी प्रतिबंधित केला जाईल, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नामांकित कॉलेजांचा कटऑफ चढाच
मुंबईतील काही नामांकित कॉलेजांचा विशेष फेरीचा कटऑफही चढाच पाहायला मिळाला आहे. कटऑफमध्ये कुठे किंचीत वाढ तर कुठे घट पहायला मिळाली. एचआर कॉलेजचा कॉमर्सचा कटऑफ 96.6 टक्क्यांवर आहे, तर रुईयाची आर्टस्ची गुणवत्ता यादी 91.4 टक्क्यांवर आणि सायन्सची यादी 92.4 टक्क्यांवर क्लोज झाली. केसी कॉलेजचा आर्टस्चा कटऑफ खाली आला असून 72.2 टक्क्यांवर क्लोज झाला आहे, तर झेवियर्सची सायन्सची गुणवत्ता यादी 73.6 टक्क्यांवर आहे.