मंदी पुन्हा एकदा दारात उभी ठाकल्याने पोटात भीतीचा गोळा उठला आहे. महासत्ता अमेरिका मंदीच्या सावटाखाली असल्याचे वृत्त धडकले आणि जगभरात आज हाहाकार उडाला. त्याचा पहिला झटका शेअर बाजारांना बसला. शेअर बाजार धडाम्कन कोसळले. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकाचे नवे विक्रम रचणारा मुंबई शेअर बाजार व निफ्टीतही मोठी घसरगुंडी उडाली आणि गुंतवणूकदारांचे एकाच सत्रात 17 लाख कोटी बुडाले. जगातील सर्वच प्रमुख शेअर मार्केटचा ‘बाजार’ मंदीच्या दहशतीने उठला.
अमेरिकेत रोजगाराच्या संधी घटल्यामुळे आणि डॉलरही कमकुवत झाल्यामुळे पुन्हा एकदा मंदीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वी काही वित्तीय संस्थांनी दिला होता. हे संकेत खरे ठरवणाऱया घडामोडींनंतर अमेरिकेपाठोपाठ जपानचा शेअर बाजारही आज कोसळला. गुंतवणूकदारांची उमेद आणि खिसा खचवणाऱया अमेरिका आणि जपानमधील आर्थिक घडामोडींनंतर जगातील सर्वच प्रमुख शेअर बाजारांमध्ये समभाग विक्रीचा वेग वाढला. याचे पडसाद हिंदुस्थानच्या शेअर मार्केटमध्येही उमटले.
प्रमुख वित्तीय संस्था आणि मोठय़ा गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावल्यानंतर सकाळच्या सत्रातच प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 2.5 टक्क्यांहून अधिक कोसळले. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध पंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 17 लाख कोटींनी घसरून 440.16 लाख कोटींपर्यंत खाली उतरले.
अमेरिकेच्या डाऊ जोन्स निर्देशांकाबरोबरच जपानचा निक्केई घसरला असतानाच, चीनचा शांघाय निर्देशांक आज भुईसपाट झाला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही खालावला. दक्षिण कोरिया, युरोपीय बाजारांतही घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक पिछेहाटीमुळे मुंबई शेअर मार्केटमध्ये रिअल्टी क्षेत्र, आयटी, बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे.
शेअर बाजारातील चढत्या निर्देशांकाने सुखावलेल्या गुंतवणूकदारांना मंदीच्या या शक्यतेने जमिनीवर आणले आहे. बाजार तेजीत वाटला तरी बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचली असल्याचे संकेत राष्ट्रीय शेअर बाजार तथा एनएसईच्या इंडिया व्हीआयएक्स मापनाने दिले होते. या निर्देशांकाचा उपयोग नजीकच्या कालावधीतील अस्थिरता आणि बाजारातील चढ-उतारांची शक्यता मोजण्यासाठी केला जातो. सोमवारच्या सत्रात हा व्हीआयएक्स निर्देशांक एका सत्रात 22 गुणांकावरून थेट 52 गुणांकावर पोहोचला होता. 9 वर्षांतील उच्चांकी गुणांक गाठणाऱया या निर्देशांकाने बाजारात अस्थिरता मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचेच संकेत दिले आहेत.
जपानमध्येही पडझड
बँक ऑफ जपान या मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक धोरणामुळेही जपानचे शेअर मार्केट कोसळले आहे. गेल्या बुधवारी बँकेने मुख्य व्याजदरात वाढ केली. 2007 नंतर 17 वर्षांनी व्याजदरात वाढ करून तो उणे 0.1 वरून आता 0 ते 0.1 करण्यात आला आहे. तेव्हापासून तेथील शेअर बाजाराचा निर्देशांक निक्केईची घसरगुंडी सुरू झाली आहे. बँक ऑफ जपानने दरवाढीची घोषणा करतानाच भविष्यात आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत. बाँड खरेदीत कपात करण्याची घोषणाही बँकेने केल्यानंतर जपानचे शेअर मार्केट आज कोसळले.
इराण-इस्रायलमधील भडकाही तेल ओतणार
इराण, हमास आणि हेजबोला हे तिघेही इस्रायलविरोधी हल्ल्यासाठी एकत्र येणार असल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. यामुळे खनिज तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे. सध्या तेलाची जागतिक मागणी कमी असल्याने खनिज तेलाच्या किमती 8 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहेत. इराण-इस्रायलमधील संभाव्य भडकाही जागतिक मंदीच्या वातावरणात तेल ओतू शकतो.
अमेरिकेत काय घडते आहे…
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक जवळ आली असताना पुन्हा एकदा मंदीने डोके वर काढले आहे. गेल्या आठवडय़ातच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक तपशिलामुळे ही शक्यता दाट झाली होती. तेथील ‘साहम रिसेशन इंडिकेटर’ हा मंदीचा सूचकांक 0.5 टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. जुलैमध्ये नोकऱयांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या मासिक सरासरी 2,15,000 रोजगारांच्या तुलनेत यंदा केवळ 1,14,000 रोजगार संधी उपलब्ध झाल्या होत्या. याव्यतिरिक्त, तिथे बेरोजगारी ऑक्टोबर 2021 पासूनच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 4.3 टक्क्यांवर पोहोचली आहे.
एकाच सत्रात 17 लाख कोटी बुडाले
अमेरिकेतील मंदीने टकटक केली आणि आठवडय़ाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज सेन्सेक्स दिवसअखेर 2,222.55 अंकांनी घसरला. आज बाजारात व्यवहार सुरू होताच पहिल्या अर्ध्या तासात गुंतवणूकदारांचे जवळपास 15 लाख कोटी बुडाले. एकीकडे सेन्सेक्सची तब्बल 2400 अंकांहून जास्त मोठी घसरगुंडी झाली असतानाच दुसरीकडे निफ्टी 50 नेही सेन्सेक्सप्रमाणेच तळ गाठला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी एका फटक्यात बुडाले. बाजारातील या गटांगळय़ांमुळे शेअर बाजाराचे एकूण मूल्य तब्बल 17 लाख कोटींनी घसरल्याचे दिसून आले.
आपल्या कर्जाच्या हप्त्याचे काय होणार?
गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असतानाच, सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करणारी रिझर्व्ह बँकेची पतधोरणाची बैठक उद्या 6 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. बँकेने रेपो दरात कपात केली तर स्वस्त गृहकर्ज आणि कमी व्याजदर असा लाभ लोकांना मिळू शकतो. मात्र खाद्यपदार्थ, भाज्या, किराणा माल सर्वच वस्तूंच्या भडकत्या भावांनी प्रत्येक गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. ही वाढती महागाई रोखण्यासाठी यावेळीही रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे राखले तर व्याजदर चढेच राहतील. रेपो दरात कपात झाल्यास कार आणि गृहकर्जाचे मासिक हप्ते तुलनेने कमी होतील. या बदलांची घोषणा 8 ऑगस्टला होईल.