यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला दोन पदके जिंकून देणारी नेमबाज मनू भाकर हिला ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यात हिंदुस्थानी पथकाची ध्वजवाहक होण्याचा बहुमान देण्यात आला आहे. हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) एका वरिष्ठ अधिकाऱयाने ही माहिती दिली. हरयाणाच्या झज्जरमध्ये राहणारी मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास घडविला. तिने 10 मीटर एअर पिस्टलच्या महिला एकेरी व सरबज्योत सिंहच्या साथीत मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला कांस्यपदक जिंकून दिले. त्यामुळे मनू भाकर ही हिंदुस्थानी पथकाची ध्वजवाहक होण्याची हकदार आहे, असे मत ‘आयओए’च्या पदाधिकाऱयांनी व्यक्त केले.