हाणामारीत महिलेचे केस ओढणे विनयभंग होत नाही. विनयभंगात हेतू स्पष्ट व्हायला हवा, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. महिलेला लज्जा येईल असे कृत्य म्हणजे वियनभंग होते. हाणामारीत महिलेचे केस ओढणे किंवा तिला ढकलणे, या कृत्याने कोणत्याही प्रकारची लज्जा येत नाही. हा हाणामारीचा भाग आहे. त्यासाठी मारहाणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा प्रकरणात विनयभंगाच्या गुह्याचा समावेश केला जाऊ शकत नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
न्यायालयाने फेटाळली मागणी
आरोपींनी महिलेचे केसे ओढले. तिला धक्काबुकी केली. महिलेने तसे जबाबात सांगितले आहे. आरोपींविरोधात विनयभंगाचे कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्याचे वकील अनिकेत निकम यांनी केली. केस ओढणे किंवा धक्काबुकी विनयभंगाच्या व्याख्येत येत नाही. तसे महिलेनेदेखील जबाबात म्हटलेले नाही. विनयभंगासाठी हेतू स्पष्ट व्हायला हवा, असे नमूद करत खंडपीठाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली.
बागेश्वरबाबाच्या अनुयायांनी केली मारहाण
ओशिवरा येथील नितीन उपाध्याय यांनी ही याचिका केली होती. धीरेंद्र शास्त्राr(बागेश्वरबाबा) यांना मी ओळखतो. त्यांच्या एका कार्यक्रमासाठी मी गाडी दिली होती. त्यानंतर त्यांचे अनुयायी अभिजित करंजुळे, मयूरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजाळ, अविनाश पांडे व लक्ष्मण पंत हे घरी आले. पैसे मागण्यावरून एक वाद झाला होता. यावरून त्यांनी मला धमकावले. माझ्या पत्नीचे केस ओढले. तिला हाताला पकडून ओढत नेले. मला मारहाण केली. पोलिसांनी या सर्वांविरोधात केवळ मारहाणीचा गुन्हा नोंदवला. या आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा. याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.