देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती. त्यानुसार परमबीर यांनी माझ्यावर आरोप लावून स्वतःची सुटका करून घेतली, असा दावा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके ठेवण्यात आली. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणांमध्ये तेव्हाचे मुंबई पोलिसांचे आयुक्त परमबीर सिंह मास्टरमाईंड होते. त्यांना एनआयएमार्फत अटक होणार होती. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांना शरण गेले. फडणवीसांनी परमबीर यांना मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावले. त्या दोघांमध्ये डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
प्रत्येक आमदाराला 50 खोके देऊन भाजपने मविआ सरकार पाडले
चांदीवाल चौकशी समितीचा अहवाल हा महाविकास आघाडीच्या कार्यकाळात आला होता. फडणवीस यांनी केलेला दावा खरा आहे. मात्र, हा अहवाल आल्यानंतर काही दिवसातच आमचं सरकार कोसळलं. त्याला जबाबदारदेखील त्यांचाच पक्ष होता. प्रत्येक आमदाराला 50 खोके देऊन भाजपने मविआ सरकार पाडले. त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सादर केलेला अहवाल जाहीर होऊ शकला नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.
पुरावे समोर आणा, मी नार्को टेस्टला तयार
मी तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीसांना भेटलो, त्यांच्यासोबत डील झाली असा आरोप अनिल देशमुख करतायत. त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर समोर आणावेत. जर ते सत्य बोलत असतील तर त्यांनी नार्को टेस्टसाठी पुढे यावे. जे सत्य असेल ते उघड होईल. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी डील होती की नाही हे त्यामधून पुढे येईल, असे परमबीर सिंह म्हणाले. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे यांच्या माध्यमातून आपल्याला धमकावण्यात आले होते. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख वरळीतल्या एका हॉटेलमध्ये भेटला होता. त्या वेळी त्याने मी आरोप मागे घेतले तर पोलीस महासंचालकपदी बढती दिली जाईल, असा प्रस्तावही दिला होता, असा दावा परमबीर यांनी केला.