
मिंधे आणि भाजप सरकारच्या फायद्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने होणाऱया महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड परिसरातील सुरक्षित मोकळय़ा जागांमध्ये आता मिंधे-भाजप सरकारकडून होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी घाटकोपर छेडानगरसारखी होर्डिंग दुर्घटना घडून जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, होर्डिंगचे कंत्राट आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला देण्यासाठी निविदेतही घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मिंध्यांसाठी ‘लाडका कंत्राटदार’ योजना आणू नका असा इशारा देतानाच ‘कोस्टल रोड’ परिसरात होर्डिंगमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहील, असा इशारा आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिकेला दिला.
आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेच्या ‘होर्डिंगमुक्त कोस्टल रोड’ संकल्पनेविरोधात जाऊन मिंधे-भाजप सरकारकडून तुटपुंज्या नफ्यासाठी मोकळय़ा जागांवर होर्डिंग लावण्यासाठी मंजुरी देण्याचे प्रकार समोर आल्याचे त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कोस्टल रोड हमीपत्राचे उल्लंघन करून लगतच्या टाटा गार्डन आणि हाजी अली गार्डनमध्ये भाजपच्या कंत्राटदार मित्राच्या फायद्यासाठी अनेक होर्डिंग मंजूर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या दोन्ही जागा ‘कोस्टल रोड रेग्युलेशन झोन’ (सीआरझेड) 2 अंतर्गत आहेत. कोस्टल रोडमुळे निर्माण होणाऱया गार्डनमध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिक मोठय़ा संख्येने येणार आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी होर्डिंगमुळे कोणतीही अनुचित घटना घडली तर तुम्ही जबाबदार राहाल, असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला. शिवाय होर्डिंग निविदेतही आर्थिक अनियमितता आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. यावेळी आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी आवश्यक तयारी करा
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईतील रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. त्यामुळे मंडळे आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्यांची डागडुजी, आगमन-विसर्जन मार्गातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापाव्यात आणि गणेशोत्सवासाठी पालिकेची आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.
‘बेस्ट’ला मदत करा
बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने बेस्टला आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली. बेस्टच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक बसेस वाढवाव्यात, बेस्टची भाडेवाढ केली जाऊ नये, कर्मचाऱयांचा पगार आणि पेन्शनची तारीख चुकवली जाऊ नये अशा मागण्याही त्यांनी केल्या.
रस्ते कंत्राट रद्द करा
दक्षिण मुंबईतील रस्ते कामाचे कंत्राट देताना 9 टक्के दराने वाढीव काम का दिले याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. हे कंत्राट रद्द करावे अशी मागणी करताना दोन महिन्यांनी जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अशा केल्या इतर मागण्या
– लोअर परळ येथील उड्डाणपुलावर फूटपाथ नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या पुलावर पदपथ, बस थांबे व जिन्यांची व्यवस्था करावी.
– महापालिकेच्या सर्व महाविद्यालये व रुग्णालयांमधील आंतरवासीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन 11 हजारांवरून 18 हजारांपर्यंत वाढवा.
– लोअर परळ खिमजी चाळ क्र. 2, सेनापती बापट मार्ग शेजारी असणाऱया कंपाऊंडला लागून असलेले महाकाय धोकादायक होर्डिंग तातडीने हटवा.
– मिंधे सरकारच्या 11 जानेवारी 2023 च्या सूचनेनुसार पालिकेतील कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांच्या 8490 रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करा.
– रहिवासी, प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी भुलाभाई देसाई रोडवरील श्याम निवास को-ऑपरेटिव्ह सोसायटीजवळचे बॅरिकेड्स हटवा.
भाजप, मनसेचा ‘समाचार’!
आम्ही बोलल्यावर भाजप प्रशासनाला काहीतरी पत्र देण्याचे नाटक करते, ही नाटके भाजपने बंद करावीत. हिंमत असेल तर हे कंत्राट काढून घ्यावे, असे आव्हानच त्यांनी भाजपला दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बदनामीचा भाजपचा प्रयत्न आता उघडा पडल्याचा टोलाही त्यांनी लगावत, भाजपचे राजकारण नीच आणि घातक असल्याचे ते म्हणाले. मनसेने उमेदवार घोषित केल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, पाच वर्षांनंतर हा पक्ष झोपेतून उठला आहे. आता महाराष्ट्रात दौरे चालले आहेत. हा सुपारी पक्ष आहे. ते त्यांचं काम करताहेत, आम्ही आमचे काम करू, असा चांगलाच ‘समाचार’ आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मनसेचा घेतला.