>> योगेश जोशी
सणांचा आणि उत्सवांचा असा श्रावण महिना सुरू झाला आहे. या महिन्यात नवविवाहित महिलांना उत्सुकता असते ती म्हणजे मंगळागौरी व्रताची…मंगळागौरी व्रत म्हणजे नेमके काय, ते कशासाठी आणि का करतात, ते कसे करतात, याची माहिती आपण घेतली. आता नेमके या व्रतामागची कथा किंवा कहाणी काय आहे, ते जाणून घेऊया.
गौरी म्हणजे पार्वती…महादेव हेच पती म्हणून मिळावे यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली. देवी पार्वतीच्या नावावरून या व्रताला मंगळागौरी असे नाव पडले आहे. देवीची षोडपचार पूजा केल्यानंतर गुरुजी नवविवाहितांना या व्रताची कहाणी सांगतात. श्रावणातील अनेक व्रते कहाणी ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही. इतर कहाणीप्रमाणे ही कहाणीही रंजक आणि रोचक आहे.
मंगळागौरी हे व्रत का करण्यात येते. या व्रतामुळे कोणते फळ मिळते हे या कथेतून कळते. अनादी काळापासून मंगळागौरी पुजेनंतर गुरुजींकडून ही कथा सांगण्यात येते.
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा आम्ही घेत नाही,” असें म्हणून तो चालता झाला. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या मागे लपून बस, अल्लख असे म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला हवा तसा पुत्र देईल.” असं बोलून तो बुवा निघून गेला. तिने आपल्या पतीला सांगितलं.
वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “माझ्याकडे घरेदारे, गुरेढोरे, धन द्रव्य सर्व काही आहे; मात्र पोटी पुत्र नाहीं, म्हणून मी दुःखी आहे.” देवी तिला म्हणाली, “तुला संततीचं अर्थात पुत्र सुख नाही, मात्र मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र मागितलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी मागितलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. जशी इच्छा तुझी असेल ते मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या बेंबीवर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; भरपूर घरी नेण्याकरितां घेतले. खाली उतरून त्याने पाहिले तर मोटेत आंबा एकच आहे. असं चार ते पाच वेळा घडलं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. तिच्या पोटी गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. त्यामध्ये होती एक सुंदर गोरी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणाली, “काय द्वाड आहे! काय द्वाड आहे! तेव्हा ती गोरी मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणीच व्दाड होऊ शकत नाही. मी तर तिची मुलगी आहे, मग मी कशी व्दाड असेन.” हे भाषण त्याच्या मामानं ऐकलं आणि त्याच्या मनांत आलं हिच्याशी आपल्या भाच्याचे लग्न लावून द्यावे, म्हणजे तो दीर्घायुषी होईल. पण हे नक्की कसं घडवून आणायचं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढे जर कोणी प्रवासी मिळाला तर बरं होईल, त्याला आपण पुढे करू आणि वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा शोधू लागले. तर त्यांच्या मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.
उभयतांना गौरीहारापाशी निजवलं. दोघं झोंपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. सकाळी उठून आईला ते वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आईने ते उघडून पाहू लागली, त्यामध्ये हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मंडपात आला. मुलीला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाही.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडणार ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी दिसेल अशाप्रकारे मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा अचानक जागा झाला, त्यावेळी त्याने आपल्या मामाला सांगितले की, “मला अशा प्रकारचं स्वप्न पडलं.” मामा त्याला म्हणाला, “आता हे ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्याला ओळखलं. नव-यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत करते, ही सगळी तिचीच कृपा.” सासर आणि माहेरची सर्व माणसं एकत्र आली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं.
जशी मंगळागौरी देवी तिच्यावर प्रसन्न झाली, तशी ती तुम्हांला आम्हांवर होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, हीच देवाची प्रार्थना करा. अशी धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली ही कथा साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
अशी ही कहाणी सर्व उपस्थित नवविवाहित महिलांना सांगण्यात येत. आपले सौभाग्य मंगळागौरीच्या कृपेने अखंड राहो, अशीच प्रार्थना या कहाणीतून करण्यात आली आहे. दिवसभर उपवास करून रात्री जागरण करत अनेक खेळ खेळत हे व्रत साजरे करण्यात येतात. या व्रतातील कहाणी आणि काही गोष्टी कालबाह्य वाटत असल्या तरी त्यातून देण्यात येणारी शिकवण आणि बोध यासाठी अशा कहाण्या रचण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा हेतू लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.