पेन चोरला म्हणून तिसरीच्या मुलाला तालिबानी शिक्षा, हात-पाय बांधून लाकडाने मारहाण, नंतर…

कर्नाटकातील रायचूर येथील रामकृष्ण आश्रमात एक अमानूष घटना घडल्याचे समोर आले आहे. पेन चोरल्याच्या आरोपातून तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. क्रूरपणाचा कळस म्हणजे मारहाणीनंतर हात-पाय बांधून मुलाला तीन दिवस आश्रमातील खोलीमध्ये कैद करण्यात आला. मारहाणीमुळे पीडित मुलाच्या अंगावर वळ उठले असून डोळेही सुजले आहेत. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

तरुण कुमार असे मुलाचे नाव आहे. तो सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतो. मात्र घरची परिस्थिची हलाखीची असल्याने आश्रमामध्ये रहात होता. खेळताना त्याने पेन चोरला अशी माहिती त्याच्या मित्रांनी आश्रमातील गुरुजी वेणुगोपाल यांना दिली. यामुळे संतापलेल्या गुरुजींनी त्याला तालिबानी शिक्षा दिली. याची माहिती मिलताच तरुणच्या आईने आश्रमात धाव घेतली. सध्या पीडित मुलावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या शरिरावर अनेक जखमी असल्याचे दिसून आले. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तरुणची आई रुपाने सांगितले की, माझ्या मुलाचे नाव तरुण असून तो तिसरीत शिकतो, तर दुसऱ्या मुलाचे नाव अरूण असून तो पाचवीमध्ये शिकतो. दोघेही आश्रमात राहतात. मी आश्रमात पोहोचली तेव्हा मोठ्या मुलाने तरुणवर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. पेन चोरल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. मात्र त्याने पेन चोरला नाही, तर खाली पडलेला पेन उचलला आणि दुसऱ्या जागी ठेवला.

रविवारी माझ्या मुलाला मारहाण झाली. मोठ्या मुलाने ही माहिती दिली. त्याला बेल्टने मारहाण करण्यात आली. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि हात-पाय बांधून ठेवले. रात्रभर त्याला मारहाण होत होती. त्याला मारहाण करण्यासाठी आणखी काही मोठ्या मुलांनाही बोलावले होते, असा आरोप पीडित मुलाच्या आईने केला.

दरम्यान, पीडित मुलानेही त्याच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. दोन मोठी मुलं आणि एका गुरुजींनी मला मारहाण केली. जळकी लाकडांनी मला मारलं. ती तुटल्यावर बॅटने मारहाण केली. यामुळे माझ्या शरिरावर जखमी झाला. एवढेच नाही तर मला यादगिरीला नेले आणि तिथे रेल्वे स्थानकावर भीक मागण्यास लावली. पण मला काही पैसे मिळाले नाही. त्यानंतर मला रात्री 8.30 वाजता पुन्हा मारहाण करण्यात आली, असा आरोप पीडित मुलाने केला.