हायटेक कारभाराचा भंडाफोड, शेकडो वाहकांची भिस्त ‘ट्रे’वर टीएमटीच्या तिकिटांची बॅटरी ‘डाऊन’

टीएमटीच्या हायटेक कारभाराचा भंडाफोड झाला असून तिकिटांची बॅटरीच ‘डाऊन’ झाली आहे. अपुरा वीजपुरवठा, दर्जेदार ईटीव्हीएम मशिन्सची कमतरता, देखभालीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे पन्नास टक्क्यांहून अधिक तिकीट मशिन्स बंद आहेत. त्यामुळे टीमएटीच्या शेकडो वाहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची भिस्त आता फक्त ‘ट्रे’ वरतीच आहे. इलेक्ट्रिक तिकिटांऐवजी आता छापील तिकिटे प्रवाशांना देण्यात येत असल्याने वाहकांच्या डोक्याची ‘कट कट’ ही वाढली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ट्रेमधील तिकिटे देण्याची पारंपरिक पद्धत बंद करून टीएमटी प्रशासने ईटीव्हीएम मशिन्सच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे छपाई तसेच कागदाचा खर्चदेखील वाचला. मात्र ऐन पावसाळ्यात आता या मशिन्सचे रडगाणे सुरू झाले आहे.

आनंदनगर,कोपरी तसेच वागळे या डेपोमधील वाहकांसाठी प्रशासनाने हजारो इलेक्ट्रिक मशिन्स विकत घेतल्या. त्याचा ठेका केपीएमजी या कंत्राटदाराला दिला आहे. मात्र या मशिन्सची पुरेशी देखभाल होत नसल्याची बाब आढळून आली आहे.

इलेक्ट्रिक मशिन्स हाताळणे आता वाहकांच्या अंगवळणी पडल्याने ट्रेमधून तिकिटे देणे त्रासदायक होत आहे. तिन्ही आगारांमध्ये मशिनच्या चार्जिंगसाठी पॉइंट आहेत. पण ते अपुरे पडतात. एक मशीन चार्ज होण्यासाठी अंदाजे पाऊण तासांचा कालावधी लागतो. पण व्यवस्थित वीजपुरवठा होत नसल्याने मशिन्स चार्जिंगच होत नाहीत. चालक व वाहकांना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे डेपोतून बसेस काढाव्या लागत असल्याने अनेकांना सध्या छापील तिकिटांचा ट्रे जवळ बाळगावा लागतो. आता त्याची सवय नसल्यामुळे वाहकांना त्याचा त्रास होतो.