गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड, दोन किलोमीटरची पायपीट; गडचिरोलीतील विदारक चित्र

‘लाडकी बहीण’ योजना वाजतगाजत सुरू केली; परंतु दुर्गम भागातील लाडक्या बहिणींना आणखी काय काय पाहण्याची वेळ येणार आहे हे मिंधे सरकारलाच ठाऊक. गडचिरोली जिह्यातील दुर्गम भागात मुख्य रस्त्यांवरील नदीनाल्यांवर पूल नसल्याने पावसाळय़ात येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

गडचिरोली जिह्यातील कोरची तालुक्यात असेच एक विदारक चित्र समोर आले. कोरची तालुक्यातील चर्विदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीकळा आल्याने गावकऱयांना तिला अक्षरशः खाटेची कावड करून दोन किलोमीटर पायपीट करत रुग्णालयापर्यंत न्यावे लागले. रोशनी शामराव कामरो (23) असे या गर्भवतीचे नाव आहे.

गडचिरोली जिह्यात एकूण 12 तालुक्यांचा समावेश आहे. कोरची हा अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त तालुका असून छत्तीसगड सीमेवर वसलेला तालुका आहे. या तालुक्यात बऱयाच गावांचा स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही पाहिजे तसा विकास झालेला नाही. कोरची तालुक्यातील चर्विदंड येथील रोशनी कामरो या गर्भवती महिलेला शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. गावालगत दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लेकुरबोडी येथे उपपेंद्र आहे. परंतु तेथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. नाल्यावर पूलही नाही. त्यामुळे गावात रुग्णवाहिका आणि इतर कुठलेही चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. अखेर तिच्या घरच्यांनी गावकऱयांच्या मदतीने खाटेची कावड करून लेकुरबोडी गाठले. लेकुरबोडी येथून खासगी वाहनाने कोरची तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.

फक्त प्रवासआणि प्रवासच

ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱयांनी आरोग्य तपासणी करून तिला गडचिरोलीला जाण्यासाठी सुचवले. रुग्णवाहिकेने गडचिरोलीकडे जात असताना बेडगाव-पुराडादरम्यान असलेल्या घाटमाथ्यावर भफर रस्त्यात दोन ट्रक अडकून हा मार्ग अक्षरशः बंद होता. यावेळी रुग्णवाहिकेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱयांनी कुरखेडा येथून दुसरी रुग्णवाहिका बोलावून तिला गडचिरोलीला पाठवले. दरम्यान, तिला काही अंतर पायी चालत जावे लागले.

26 जुलै रोजी भामरागड तालुक्यातील भाटपार येथील मालू केये मज्जी या 67 वर्षीय जखमी पित्याला घेऊन मुलावर मित्राच्या मदतीने खाटेची कावड करून 18 किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा तीच परिस्थिती कोरची तालुक्यातही पाहायला मिळाली.