कोस्टल रोडवर होर्डिंग्ज उभारण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध

कोस्टल रोडजवळच्या मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. खोक्यांसाठी आणि कंत्राटदार मित्रांसाठी हा घाट घातला जात आहे. शिवसेनेचा त्याला तीव्र विरोध असून मिंधे आणि भारतीय जनता पार्टीला मुंबई विद्रूप करू देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आज कडाडले.

कंत्राटदार मित्रांसाठी मिंधे-भाजपला मुंबई विद्रूप करू देणार नाही – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून मिंधे-भाजपला उघडे पाडले आहे. कोस्टल रोडजवळच्या हाजी अली आणि अमरसन्स पार्क / ब्रीच कॅण्डी येथील गार्डन्सच्या मोकळय़ा जागांवर मोठय़ा प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्याची मिंधे-भाजपची योजना असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. मुंबईकरांसाठी या जागा खुल्या होण्यापूर्वीच सरकारने कोस्टल रोडलगतच्या प्रस्तावित मोकळय़ा जागांमध्ये किमान 4-5 होर्डिंग्जसाठी मोकळय़ा जागा तयार केल्या आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजप-मिंधे राजवटीला फक्त खोक्यांची आणि ठेकेदारांची काळजी आहे, नागरिकांची नाही, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

शिवसेनेने कोस्टल रोडच्या उभारणीची सुरुवात केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोडचे कामही ठरल्याप्रमाणे होत होते. मिंधे सरकार सत्तेवर येताच कोस्टल रोडला उशीर झाला. इतकेच नव्हे तर प्रकल्पावरचा खर्च वाढला. कोणतेही नियोजन न करता केवळ निवडणुकीच्या श्रेयासाठी मिंधे सरकारने चुकीच्या मार्गिका उघडल्या. लँडस्केपिंग आणि बागकामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा केली नाही, याकडेही आदित्य ठाकरे यांनी या पोस्टद्वारे लक्ष वेधले आहे.

मुंबईला उद्ध्वस्त करणारे अधिकारी, कंत्राटदारांना नक्की शिक्षा करू

शिवसेनेचा या होर्डिंग्जना तीव्र विरोध आहे. शिवसेनेच्या मूळ कोस्टल रोड प्रकल्पामध्ये तसेच त्यासंदर्भात न्यायालयात सादर झालेल्या हमीपत्रात होर्डिंग्जना स्थानच नव्हते, असेही आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार येताच ही होर्डिंग्ज उतरवू आणि मुंबईला उद्ध्वस्त करणारे अधिकारी आणि कंत्राटदारांना शिक्षा करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.