आकर्षक दिसणे, फिट राहण्यासह वजनाच्या होणाऱया त्रासामुळे नागरिकांकडून विशेषतŠ महिलांकडून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. शस्त्र्ाक्रिया करून वजन कमी केले जाते. मात्र, अशापद्धतीने उपचार एरंडवण्यातील एका महिलेला महागात पडले असून, शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे संबंधित महिला गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडली आहे. शस्रक्रियेपूर्वीच्या तपासण्या या अपूर्ण स्वरूपात करण्यात आल्या. तसेच शस्रक्रियेतही डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला.
डॉ. प्रशांत यादव, डॉ. स्वप्नील नागे अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. याबाबत महिलेच्या पतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी यांची पत्नी खराडीतील एका आयटी कंपनीत क्वालिटी इंजिनीयर म्हणून काम करत होती. वजन जास्त असल्याने त्यांना इंटरनेटवर एरंडवणेतील डिझायर क्लिनिकसंदर्भात समजले. फिर्यादी यांच्या पत्नीला क्लिनिकमधून वेळोवेळी फोन करून शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून साडेचार लिटर फॅट काढण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्या लवकर शुद्धीवर आल्या नाहीत. शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर पल्स रेट, बीपी, तसेच ऑक्सिजनचा मेंदूला पुरवठा न झाल्याने मेंदूला इजा पोहचली. 3 महिने खासगी रुग्णालयात उपचार करूनही फरक पडला नाही. दोन वर्षांपासून त्या बोलत नाहीत. फक्त डोळे उघडझाप करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.