चांदीवाल अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली असल्यानेच फडणवीसांनी तो दडवून ठेवला, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
दहशतवादी सचिन वाझेच्या कुबडय़ा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर माझ्यावरील आरोपांच्या चौकशीचा न्यायमूर्ती चांदीवाल अहवाल सार्वजनिक करा, असे थेट आव्हान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फडणवीस यांना दिले.
अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप करणारे पत्र बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी दिले. त्यावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनी वाझे आणि तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तीन वर्षांपूर्वी केलेलेच ते आरोप आहेत असे म्हटले आहे. त्या वेळी माझ्यावरील आरोपांची न्यायमूर्ती चांदीवाल यांनी चौकशी करून 1400 पानांचा अहवाल राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला आहे. तो समोर आणावा यासाठी फडणवीसांना अनेकदा पत्रे लिहिली, परंतु त्यांनी तो अहवाल दडवून ठेवला आहे, असा दावा देशमुख यांनी केला.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केली होती. मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले होते की, सचिन वाझे हा दोन खुनांच्या गुह्यात आरोपी असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाहीत, अशी कबुलीही वाझे याने न्यायालयीन चौकशीत दिली होती.
परमवीर सिंग यांनासुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल यांनी चौकशीसाठी बोलवले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवूनसुद्धा ते आले नाहीत. शेवटी अटक वॉरंट काढल्यावर त्यांनी वकिलामार्फत न्यायालयात शपथपत्र लिहून दिले होते. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत, असे देशमुख यांनी सांगितले.