गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने पुणे आणि नाशिकवर पूरसंकट ओढवले आहे. दोन्ही जिह्यांतील धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणांमधून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने मुठा नदीला पूर आला आहे. एकता नगरमध्ये पाणी शिरले असून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे. तेथील गंगापूरसह सात धरणांमधून विसर्ग होत आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
खडकवासलातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पुण्यातील मुठा नदीला पूर.
संततधार पाऊस व धरणांतून पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला.
मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वरमध्ये घरांमध्ये पाणी घुसले. मंदिर परिसरात रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी साचले होते. त्यामुळे भाविकांची कोंडी झाली.