किरकोळ वादातून महिलेची हत्या करून पळालेल्या प्रियकराला अखेर एमएचबी पोलिसांनी अटक केली. राजू गनोर साह असे त्याचे नाव आहे.
पुनियादेवी ही मूळची बिहारची रहिवासी होती. ती तिच्या मुलासोबत दहिसरच्या गणपत पाटील नगर येथे राहत होती. तेथेच राजूदेखील राहत होता. राजू आणि पुनियादेवीचे प्रेम संबंध होते. राजू हा पुनियादेवीवर संशय घेत असायचा. त्यावरून त्याची भांडण होत असायची. गेल्या आठवडय़ात राजू आणि पुनियादेवीचे भांडण झाले. पुनियादेवी गॅसवरून भाताचे टोप उतरवत असताना राजूने तिच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केला. लोखंडी वस्तू लागल्याने आणि भाताचा टोप पुनियादेवीच्या अंगावर पडल्याने ती गंभीररीत्या भाजली. शताब्दी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर याच्या पथकातील उपनिरीक्षक किरण सुरासे, उपनिरीक्षक संदीप गोरडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, आज एमएचबी पोलिसांनी दहिसर परिसरात सापळा रचून राजूला अटक केली.