गणेशोत्सवात कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱया 6 गणपती स्पेशल गाड्यांच्या 166 गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल झालेले असतानाच पश्चिम रेल्वेच्या 6 गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षणही अवघ्या 5 मिनिटांतच हाऊसफुल झाले आहे. प्रतीक्षा यादी 800 वर पोहोचली असून स्पेशलना ‘रिग्रेट’चाच संदेश येत असल्याने गणेशभक्त पुन्हा ‘वेटिंग’वर राहिले आहेत.
गणपती स्पेशलच्या गणेशोत्सवातील काही फेऱ्यांना ‘रिग्रेट’चाच संदेश झळकत आहे. आरक्षित तिकिटांअभावी चाकरमान्यांना गाव गाठण्याची चिंता सतावत आहे. रेल्वे प्रशासनाने आणखी जादा गणपती स्पेशल गाडय़ा जाहीर करून गणेशभक्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केलेल्या सीएसएमटी मुंबई-सावंतवाडी, सीएसएमटी- रत्नागिरीसह एलटीटी-कुडाळ स्पेशलच्या 3 गाडय़ा अशा 6 गाडय़ांचे आरक्षण खुले होताच अवघ्या 8 मिनिटांतच गणपती स्पेशल फुल झाल्याने गणेशभक्तांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घ्यावी लागली होती. पश्चिम रेल्वेनेही गणेशभक्तांच्या दिमतीला धावत मुंबई सेंट्रल- ठोकूर, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी, बांद्रा-कुडाळ, अहमदाबाद-कुडाळ, विश्वमैत्री-कुडाळ, अहमदाबाद-मंगळूर या 6 साप्ताहिक गणपती स्पेशल जाहीर केल्या होत्या.
गणेशोत्सवात गावी जायचे कसे?
मध्य रेल्वेच्या 6 गणपती स्पेशलच्या 166 फेऱयांपाठोपाठ पश्चिम रेल्वेच्याही 6 गणपती स्पेशल गाडय़ांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटांतच फुल झाल्याने चाकरमान्यांची पुन्हा कोंडी झाली आहे. खासगी बस चालकांकडून दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत तिकीट परवडणारे नसल्याने चाकरमान्यांना गणेशोत्सवात गावी जायचे तरी कसे, असा प्रश्न सतावत आहे.