केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनात तब्बल चार गावे गायब झाली. अजूनही बचावकार्य सुरूच असून मृत्युमुखी पडणारांचा आकडा फुगतच चालला असताना आता जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील पंगन भागात शनिवारी रात्री उशिरा ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे अचानक पूर आला. यात अनेक घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले. अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. पूर आल्यामुळे श्रीनगर- लेह राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुरामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 40 बेपत्ता आहेत.
उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब, हरयाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, चंदीगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, आसाम, मेघालय, केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये 7 ऑगस्टपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
114 रस्ते बंद
हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीच्या अनेक घटनांमुळे तब्बल 114 रस्ते बंद करण्यात आले आहेत. हवामान विभागाने 7 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जून ते 1 ऑगस्टदरम्यान पाऊस, पूर आणि भूस्खलनात 79 जणांचा मृत्यू झाला. कुलू, मंडी आणि शिमला येथे अनेकदा ढगफुटी झाली.
पूरग्रस्तांना 50 हजार रुपयांची तत्काळ मदत
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा हिमाचल सरकारचे मंत्री विक्रमादित्य यांनी केली आहे. तसेच पुढील 3 महिन्यांसाठी भाडे, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी दरमहा 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, हिमाचल पोलीस बचाव मोहीम राबवत आहेत.