बोनजॉर पॅरिस – मेरा गम कितना कम है…

>>मंगेश वरवडेकर

पदकाच्या अपेक्षांची सुरू असलेली धावाधाव संपायचे नावच घेत नाही. आज जिंकतील, उद्या जिंकतील म्हणून अवघ्या पॅरिसची स्टेडियम्स गाठतोय; पण आपले खेळाडू पदकाचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरताहेत. ऑलिम्पिक पॅरिसमध्ये सुरू आहे, पण पॅरिसमध्ये हिंदुस्थानच्या एकाही ऑलिम्पिकवीराला अद्याप आपली वीरता सिद्ध करता आलेली नाही. हे खरंय. कारण आपण तिन्ही पदके नेमबाजीत जिंकलोय आणि नेमबाजीची पिस्टल आणि रायफल पॅरिसपासून अडीचशे किमी दूर असलेल्या चतुरोक्स स्टेडियममध्ये धडधडलीय.

असो, काल पदकाच्या इच्छेने तासाभराचा प्रवास करत तिरंदाजीच्या स्टेडिमयमध्ये पोहोचलो. दीपिका कुमारीचा खेळ पदकाच्या आशा पल्लवित करणारा वाटला. सुवर्ण नाही किमान कांस्य तरी जिंकू, असे भाव मनावर उमटले होते. तिच्या आधी भजन कौरसुद्धा आघाडीवर होती. पाच सेटच्या खेळात भजनने इंडोनेशियन कोरुइनिसाशी 5-5 अशी बरोबरी साधल्यानंतर सामना शूट ऑफमध्ये गेला आणि त्यात भजन हरली. तो एक धक्काच होता. पुढे दीािपिकाने पदकाचे पेटवलेले दीप 19 वर्षीय कोरियन सुहयान नामने विझवले. या संघर्षमय सामन्यात दीपिका आघाडीवर होती, हा एक क्षण आनंदाचा होता. पदकाच्या दिशेने वाटचाल वाटली. पण शेवटच्या क्षणी कोरियन नामने विजय आपल्या नावावर लिहिला.

आपण रामायण-महाभारतात धनुष्यबाणाने केलेली युद्धे पाहिली असतील, ऐकली असतील. पण या धनुष्यबाणावर म्हणजेच तिरंदाजीवर कोरियन खेळाडूंचे इतके वर्चस्व होते की त्यांच्या तिरंदाजांना अर्जुनाप्रमाणे फक्त माशाचा डोळाच दिसतो. त्यांच्या प्रत्येक लक्ष्यात केवळ परफेक्ट टेनच भेदले जाते. मग ती तिरंदाज महिला असो किंवा पुरुष. मी आवर्जून महिलांच्या उपांत्य लढती पाहिल्या. चौघींपैकी तिघी कोरियन होत्या. उपांत्य सामन्यात सुहयान नामने फ्रान्सच्या लिसा बार्बेलिनला 6-0 असे सहज हरवले. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामना कोरियन नाम आणि लिममध्ये झाला. ही लढत लुटूपुटूची नव्हती. पहिला सेट तर 29-29 असा बरोबरीत सुटला होता. पुढे लक्ष्यभेदाचा संघर्षही झाला आणि शिहयान लिमने सोने जिंकले. जिथे आपल्याला एकही पदक मिळत नव्हते तिथे सुवर्णपदकाची लढाई एकाच देशातील खेळाडूंमध्ये होत होती. तेव्हा कोरियन्स चाहत्यांचा जल्लोष अभूतपूर्व होता. त्यांचा विजय मनाला फार जड जात होता. कोरियन्सच्या विजयाचे कौतुक करावे की आपल्या पराभवावर रडावे, कळत नव्हते.

इथे आम्हा हिंदुस्थानींची पदकासाठी असलेली लढाई प्रत्येक क्षणाला धापा टाकत होती आणि आपले शेजारी राष्ट्र असलेले आशियाई देश, मग तो चीन असो, जपान असो किंवा कोरिया. तिघेही ऑलिम्पिकवर राज्य गाजवताहेत. युरोपियन देश सोडा आपण या आशियाई देशांच्याही खूप मागे असल्याचे पदोपदी जाणवतंय. या भावना मनाला फारच अस्वस्थ करणाऱ्या होत्या.

आपले दुःख कमी करण्यासाठी मी लक्ष्य सेनच्या पाठी धावलो. उपांत्य सामना असल्यामुळे सारेच क्रीडाप्रेमी बॅडमिंटन स्टेडियमला येणार, हे स्पष्ट होते. लक्ष्यचा विजय आपल्या सोन्याची स्वप्नं जागवणारा ठरणार होता. म्हणून वेळेआधी पोहोचलो. महिलांचा उपांत्य सामना सुरू होता. स्पॅनिश कॅरोलिना मारीनने चीनच्या बिंग जिओ हिच्याविरुद्ध पहिला गेम 21-14 असा जिंकला होता. दुसऱ्या गेममध्येही मारीन ही चिनी खेळाडूला मारण्याच्या भावनेनेच खेळत होती. ती 10-8 अशी आघाडीवर होती आणि खेळताना अचानक तिचा गुडघा दुखावला. कॅरोलिना कोर्टवर कळवळू लागली. तिच्या असह्य वेदनांनी अवघं स्टेडियम कळवळलं. सुवर्णपदकाच्या दिशेने असलेली तिची धाव तिथेच थांबली अन् तिच्या आसवांचा बांध फुटला. तिचे अश्रू पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक सच्च्या चाहत्याच्या डोळय़ांच्या पापण्याही ओलावल्या. तिला देशासाठी जिंकायचे होते; पण तिला ते करता येणार नसल्याच्या भावना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. एक योद्धा कधीही वीरमरणाला घाबरत नाही. तो नेहमीच त्याच्यासाठी तयार असतो. लढता लढता आलेलं हौतात्म्य प्रत्येक लढवय्याचे स्वप्न असते, पण या वीरांगनेला ते भाग्यही लाभले नाही. बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी ती एकमेव युरोपियन खेळाडू आहे. 2016 मध्ये केलेल्या पराक्रमाची तिला पुनरावृत्ती करायची होती. पण तिच्यावर उपांत्य सामन्यातून विजयाआधीच निवृत्त होण्याचे दुःख ओढावले. ती आता कांस्यपदकासाठीही खेळणार नसल्यामुळे इंडोनेशियन ग्रेगोरिया तुनझुंगला ते न खेळताच मिळेल. एकीकडे हिंदुस्थानी खेळाडूंना पदक मिळत नव्हते म्हणून माझे मन रडत होते, दुसरीकडे झुंजार पॅरोलिनाच्या वेदनेपुढे मला माझ्या वेदना फार खुज्या भासू लागल्या. असे दुःख कधीही कुणाच्या वाटेला येऊ नये. योद्धय़ाच्या वाटेला तर अजिबातच नको.