>>द्वारकानाथ संझगिरी
आमच्या लहानपणी अभ्यास आधी, मग खेळ वगैरे ही घरची शिस्त होती. पीटीचा तास कुठलं तरी कारण देऊन टाळण्यासाठी होता. शारीरिक शिक्षण गंभीरपणे घेतलं जात नव्हतं. परवा अंजली भागवतने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘आई-वडिलांची पिढी बदलली आहे. त्यांचे सामाजिक विचार बदलले आहेत. खेळ हा एक करीअर पर्याय होऊ शकतो हे या पिढीला जाणवलं आहे. आणि ते मुलांना प्रोत्साहन देताहेत. त्याचबरोबर अर्थातच पोटाचा प्रश्न हा मोठा असतो. नेमबाजीसारखा खेळ अत्यंत महागडा खेळ असतो. साध्या गोळय़ा विकत घेण्याचा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडत नाही; पण आता सरकार मदत करतं. रेल्वे, आर्मी, एअर इंडिया, पोलीस यांसारख्या नोकरीत स्पोर्टस् कोटय़ामधून खेळाडूंना सामावून घेतलं जातं. काही खासगी पुरस्कर्ते उभे राहतात. त्यामुळे आजच्या मुलांना अद्ययावत अशा सुविधा मिळतात. हवा तो प्रशिक्षक, परदेशी स्पर्धा सर्व मिळतं.’
अंजली भागवत पुढे म्हणाली की, ‘यावेळी 21 खेळाडू आमच्या नेमबाजीच्या चमूमध्ये आहेत आणि प्रत्येक जण आपला घाम गाळून कठोर स्पर्धा करून संघात आला आहे. आठ ते दहाजण असे आहेत की, त्यांच्या गुणवत्तेचा विचार केला तर एकाच स्तरावरचे आहेत. ऐनवेळी नेमबाज मानसिक दबाव कसा घेतो आणि बुद्धिमत्ता कशी वापरतो त्यावर त्याचं यश अवलंबून असतं. नाहीतर दहाही मुलांकडे पदक मिळवायची क्षमता आहे.’ दीपाली देशपांडे यांनी मुलांना आठ-नऊ वर्षांचे असताना आपल्या छत्राखाली घेतलं. मुख्य म्हणजे, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना त्यांच्याकडे सोपवलं आणि त्यांच्यावर विश्वास टाकला. स्वप्नील कुसाळेचे वडील त्या दिवशी म्हणाले, ‘दीपाली मॅडम हीच स्वप्नीलची आई आहे. आम्ही फक्त जन्म दिला.’ देवकीच्या पोटातून जन्म घेतलेल्या श्रीकृष्णाला वसुदेवाने यशोदेकडे सोडलं आणि पुढे यशोदेने वाढवलं. दीपाली देशपांडे या मुलांची ‘यशोदा’ आहे. आठ-दहा वर्षांत तिने त्यांचं स्वप्न, धडपड, त्यांचा प्रवास, त्यांची ताकद जवळून पाहिलीय. अर्जुन बबुताला मेडल मिळेल असं सर्वांना वाटत होतं. फक्त पॉइंट एक सेकंदने त्याच्या हातून पदक गेलं. पण त्याला धीर देण्यासाठी दीपाली देशपांडे दिल्लीला गेल्या. अपयशाचा त्याच्या मनावर कुठेही दबाव पडू नये म्हणून. अशी भूमिका फार महत्त्वाची असते. ही बाम सरांची शिकवण. म्हणून मी म्हटलं, बाम सरांनी या मुलींकडे फक्त रायफल सोपवली नाही, तर पुढच्या पिढीचे भवितव्यच सोपवलं. आणि हे भवितव्य किती सुरक्षित आहे हे आजच्या नेमबाजीच्या चित्राकडे पाहिल्यानंतर कळतं.
आपण सर्वजण अजूनही या ऑलिम्पिक खेळांकडे किती गंभीरपणे पाहतो किंवा वाचतो याबद्दल मला शंका आहे. माझ्यासारख्या लेखकाचासुद्धा हा दोष आहे. क्रिकेटवर आमचं प्रेम आहे. वर्षं-वर्षं या मातीत क्रिकेट रुजल्यामुळे त्यांना प्रचंड पाठिंबा आहे. वर्तमानपत्र क्रिकेटच्या बातम्यांनी आणि वर्णनाने भरलेली असतात. पैशांची कमी नसते, पण आम्ही इतर खेळांनासुद्धा जागा द्यायला पाहिजे ना! तरच सर्वसाधारण मुलं इतर खेळांकडे आकर्षित होतील. टेलिव्हिजन आणि वृत्तपत्रांत त्याबद्दल लिहिलं गेलं पाहिजे. मनू भाकर किंवा स्वप्नील कुसाळे आपल्याला मेडल मिळाल्यानंतर ज्ञात होता कामा नयेत हे आधी ठाऊक पाहिजे. त्यांना आधीपासून पाठिंबा मिळाला पाहिजे. नाहीतर होतं काय की, ऑलिम्पिकच्या दिवसांत मेडल मिळाल्यावर आपण त्यांचा गौरव करतो, बक्षीस देतो; मात्र एकदा ते नवलाईचे दिवस संपले की, मनू भाकर आणि स्वप्नील कुसाळे वर्तमानपत्राच्या कुठल्या कोपऱ्यात फेकले गेलेले असतात हे आपल्याला ठाऊक नसतं. कधीतरी एशियाड आलं किंवा कॉमनवेल्थ गेम आले की, पुन्हा आपल्याला जाग येते. ऑलिम्पिकमध्ये धिम्या गतीने का होईना, आपण पाऊल पुढे टाकतोय. त्या पावलांना वेग कसा मिळेल हे सामान्य जनता, पत्रकार आणि मीडिया यांचासुद्धा महत्त्वाचा वाटा असायला पाहिजे. नाहीतर ही सगळी मंडळी औटघटकेचे हीरो ठरतील.