
>> योगेश जोशी
आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यंदा सोमवारपासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. त्यामुळे सोमवारीच महादेवाची उपासना का करायची, फक्त एक मूठच धान्य शंकराच्या मंदिरात का वाहायचे, असे प्रश्न मनात येतात. त्या प्रश्नांची उत्तरे सोमवारच्या कहाणीत म्हणजेच शिवामूठीच्या कहाणीत मिळतात.
पूर्वीच्या काळी या कहाण्या आजींच्या किंवा घरातील जाणत्या व्यक्तींच्या तोंडपाठ असायच्या आणि त्या पुढील पिढीपर्यंत पोहतच होत्या. आता चातुर्मासाच्या पुस्तकात या कहाण्या आणि त्या वाराची व्रत वैकल्ये कशी करावी, याची माहिती मिळते. आज श्रावणी सोमवार असल्याने श्रावणी सोमवाराची शिवामुठीचा कहाणी जाणून घेऊया.
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीकडे दुरल्क्ष करत असे. पुढे श्रावण मासातील पहिला सोमवार आला. ही रानात गेली. तिथे तिची नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना तिने विचारलं, बाई बाई, कुठं जातां? त्या म्हणाला. महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतो. तिने पुन्हा विचारले या व्रताने काय होतं? महादेवाची कृपा होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते. ती म्हणाली, मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.
ती त्यांच्यासह देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा म्हणू लागल्या, तिने विचारले हा कसला वसा? त्या म्हणाल्या…आम्ही शिवामुठीचा वसा करतो. मूठभर तांदुळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पाच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्यास तीळ, तिसर्यास मूग, चवथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिने घरून आणले. तिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. तिच्या व्रतामुळे सास-यानं विचारलं. तुझा देव कुठं आहे? तिने सांगितले, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.
पुढील सोमवारी घरची माणसं तिच्यामागं आली. तिने दर सोमवारप्रमाणे महादेवाची प्रार्थना केली. देवाची तिच्यावर कृपा झाला. नागकन्या, देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. ती पूजा करूं लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या , दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली.
पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, “हे असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
अशाप्रकारे थोड्याफार फरकाने ही सोमवारची ही कथा सांगितली जाते. या कहाणीचा मूळ उद्देश अन्नदान आणि अनन्य भक्तीची शिकवण देणे, हा आहे. त्यामुळे शिवामूठ ही केंद्रस्थानी ठेवत सोमवारची ही कहाणी सांगण्यात येते.