Yavatmal News – नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास, यवतमाळ येथील धक्कादायक व्हिडीओ

>>> प्रसाद नायगावकर 

जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी गावकऱ्यांचे हाल काही संपताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊन गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. नदीला पूर नसतानाही जवळपास गुडघाभर पाण्यातून गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील करंजी ( सो ) येथील मुख्य रस्त्याच्या नाल्यावरील 3 फूट उंचीचा पूल आहे. हा पूल अतिशय उथळ आहे. थोडा जरी पाऊस आला तरी पूल पाण्याखाली जातो. यामुळे अनेकदा शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, गावातील जि. प.शिक्षक अडकतात. पाणी कमी होण्याची तासनतास वाट पहावी लागते. काही वेळा गावकरी आपला जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढतात.

प्रशासन आणि स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच लोकप्रतिनिधींचे आणि प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तात्काळ या समस्येवर तोडगा न निघाल्यास गावकरी व विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसण्याचा इशारा करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद ठाकरे आणि समस्थ गावकऱ्यांनी दिला आहे.