
देवदर्शनासाठी जात असतानाच भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. नगर शिर्डी रस्त्यावरील राहाता तालुक्यातील कोल्हार येथील पुलावर रविवारी सकाळी हा अपघात घडला. दोघेही चांदवड येथील रहिवासी आहेत. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले.
शरद सोनू गांगुर्डे असे मयत व्यक्तीचे तर एकनाथ पुंजाराम गांगुर्डे असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दोघेही चांदवड येथील सूनारखेडे, डोंगरगाव रोड येथील रहिवासी आहेत. दोघेही चांदवड येथून शनी शिंगणापूर व मढी येथे देवदर्शनासाठी मोटारसायकल वरून निघाले होते.
रविवारी सकाळी साडेसात दरम्यान कोल्हार येथील पुलावर आरजे14 क्रमांकाच्या राजस्थान येथील ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रक चालक पसार झाला. ट्रकच्या टायरखाली आल्याने शरद गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर विखे कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे व स्थानिक नागरिकांनी लोणी पोलिसांशी संपर्क साधला. कोल्हार आउट पोस्टचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर चव्हाण यांनी तातडीने दोघांना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील शरद गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झालेला होता. सदर घटनेचा तपास लोणीचे सपोनि कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर चव्हाण करीत आहेत.