रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली. तसेच एका पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापकाने पतसंस्थेच्या माध्यमातून या नोटांचा वापर केला आहे का? याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहे.
गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (50), राजेंद्र खेतले (43), संदीप निवलकर (40) आणि ऋषिकेश निवलकर (26) यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले. कासारच्या चौकशीतून एका वकिलालाही अटक केली आहे. त्यापाठोपाठ प्रसाद राणेला रत्नागिरीतून अटक केली. रत्नागिरीमध्ये राणेची प्रसाद प्रिंटर्स हि प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.मुंबई
गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने बनावट नोटप्रकरणी अटकसत्र सुरू केल्यानंतर त्याने प्रिंटिंग मशीन घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाझुडपात फेकून दिली. गुन्हे शाखेने ही मशीन जप्त केली आहे. हुबेहूब वाटणाऱ्या नोटा मशीन तपासणाऱ्या मशीनमध्येसुद्धा ओळखल्या जात नव्हत्या. त्यामुळे आरोपींनी आतापर्यंत अनेक नोटा विविध बाजारात चलनात आणल्याचे समोर आले.