तुरुंगातून इंस्टाग्राम चालवतोय हा कुख्यात गॅंगस्टर, हरियाणाच्या गुप्तचर विभागाच्या पत्राने खळबळ

दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेला कुख्यात गॅंगस्टर नवीन बाली त्याच्या मोबाईलवर सर्रासपणे फोनवर इंस्टाग्राम वापरत आहे. त्याने तुरुंगातील त्याचे फोटोही इन्स्टाग्रामवर अनेकदा अपलोड केले आहेत. यासंदर्भात हरियाणाच्या गुप्तचर विभागाने तिहार तुरुंगाचे महासंचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

पोलीस आयुक्तांनी विशेष कक्ष आणि गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या नवीन बाली याच्यावर हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याबरोबर अनेक प्रकरणाचे गुन्हे आहेत. तो नीरज बवाना गॅंगचा महत्वाचा सदस्य आहे. अनेक प्रकरणात तो नीरजचा साथीदार राहिला आहे. रोहिणी कोर्टात 2021 साली जितेंद्र गोगी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी नवीन बालीला आरोपी बनवले आहे.

मागच्या काही दिवसांपासून हरियाणा पोलीस वेगवेगळ्या गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाऊंट तपासत होते. दरम्यान त्यांना नवीन बालीच्या अकाऊंटवर तुरुंगातील फोटो दिसले. याबाबत आता हरियाणाच्या गुप्तचर विभागाने अतिरिक्त महानिदेशक सतिश गोलचा आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त यांना याबाबत पत्र लिहीले आहे. पत्रात लिहीले आहे की, मे आणि जून महिन्यात आरोपीने तीन वेळा फोटो अपलोड केला आहे. 8 जुलै रोजी इंस्टाग्रामवर तुरुंगातील फोटो अपलोड केला आहे तो अखेरचा आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-एनसीआरमधील अनेक कुख्यात गुन्हेगार त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो-व्हिडिओ अपलोड करतात, मात्र हे फोटो-व्हिडिओ तुरुंगातून अपलोड केले जात नाहीत, तर बाहेर उपस्थित त्यांच्या साथीदारांनी अपलोड केले आहेत. न्यायालयात हजर होताना ते आरोपींचे व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात, मात्र या प्रकरणात जेलमधूनच फोटो अपलोड केले जात आहेत.