अयोध्या बलात्कार प्रकरण: अखिलेश यादव यांनी केली ‘ही’ मागणी, न्यायालयालाही केली विनंती

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील भदरसा येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा सोशल मीडीयावर मोठी मागणी केली आहे. या मागणीमध्ये त्यांनी पिडीत मुलीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचारासह तिच्या सुरक्षेबाबत मागणी केली आहे. तसेच न्यायालयालाही विनंती केली आहे.

अखिलेश यादव यांनी आपल्या सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, बलात्कार पीडितेला सरकारने चांगल्यात चांगले उपचार करावेत. तिच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी. पुढे ते म्हणाले की, माननीय न्यायालयाला विनंती आहे की, परिस्थितीची संवेदनशीलता आणि गांभिर्य लक्षात घेऊन न्यायालयाने दखल घेत पिडीतेची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा घटनांचे राजकारण करणाऱ्या लोकांचा हेतू पूर्ण होता कामा नये असेही ते म्हणाले.

याआधी शनिवारी अखिलेश यादव म्हणाले होते की, ‘अयोध्येतील भदरसा प्रकरणात बलात्कार प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांची डीएनए चाचणी करुन पिडीतेला न्याय द्यायला हवा , केवळ आरोप करून राजकारण करू नये. जो कोणी दोषी असेल त्याला कायद्यानुसार पूर्ण शिक्षा झाली पाहिजे. मात्र डीएनए चाचणीनंतर आरोप खोटे ठरले, तर त्यात सहभागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनाही सोडता कामा नये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच त्यांनी पिडीत कुटुंबाला 20 लाख रुपयांची मदत द्यावी अशीही मागणी केली होती.

उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था ढिसाळ झाली आहे,. दरदिवशी हत्या, लूट, बलात्कार सारख्या घटना घडतात. भाजप सरकार अशाप्रकारच्या घटना रोखण्यास असमर्थ ठरले आहे. भाजप सरकार खऱ्या आरोपींची पाठराखण करत आहेत. पुढे अखिलेश यादव म्हणाले की, तरीही गुन्हेगारांना भाजप सरकारची भीती नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांचे दावे फोल ठरत आहेत.