
जम्मू-कश्मीरसह देशात विविध ठिकाणी दहशतवादी हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि उप विशेष महासंचालक योगेश खुरानिया यांना पदावरून हटवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
नितीन अग्रवाल हे केरळ केडरचे 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते बीएसएफचे पहिले डीजी असतील, ज्यांना त्यांचा कार्यकाळ मध्यंतरी सोडावा लागला. अग्रवाल यांना महासंचालक पदावरून हटवल्यानंतर त्यांना आता मूळ केरळ केडरमध्ये पाठवण्यात आलं आहे, तर खुरानिया यांना ओडिशा केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे.
या वर्षी 21 जुलैपर्यंत जम्मू-कश्मीरमध्ये 24 चकमकी आणि 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 14 नागरिक आणि 14 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही अहवालांमध्ये बांगलादेश सीमेवरील घुसखोरी हेही या निर्णयाचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.