हरूनही मनूने मनं जिंकली!

दहा मीटरमध्ये पदकपराक्रम केल्यानंतर 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारातही नेमबाज मनू भाकर पदकाचे चुंबन घेणारच होती की एलिमेशनच्या सातव्या फेरीत तिची हंगरीच्या व्हेरोनिका मेजरशी 28-28 अशी बरोबरी झाली आणि शूट ऑफमध्ये  2-3 अशी हार सहन करावी लागल्याने मनूचे तिसऱया पदकाचे स्वप्न अपुरेच राहिले. मनूला या प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी तिच्या झुंजार खेळाने तिने अखंड हिंदुस्थानची मने जिंकली. ती लढलीच नाही तर जिंकलीसुद्धा. एकीकडे हिंदुस्थानचे दिग्गज हात हलवत मायदेशी परतत असताना मनूने दोन पदके जिंकण्याचा इतिहास रचला.

तीन दिवसांत दोन पदके जिंकल्यामुळे आज अवघा हिंदुस्थान मनूकडून हॅटट्रिकची अपेक्षा बाळगून होता. तिनेसुद्धा सुवर्णपदक भेदण्यासाठी निशाणा लावला होता. ती त्या दिशेने सुसाट नेम लावत सरकत होती. पहिल्या तीन डावांत तिने दहा गुणांसह दुसरे स्थान पटकावले तेव्हा तमाम हिंदुस्थानींच्या हृदयाचे ठोके वाढले, मात्र चौथ्या फेरीत तिला केवळ तीन गुण मिळवता आले आणि ती सहाव्या स्थानावर घसरली. मात्र पाचव्या आणि सहाव्या फेरीत तिने 5 आणि 4 गुण मिळवत दुसरे स्थान काबीज केले. पण आठव्या फेरीत मनुचे दोन शॉट्स चुकले आणि ती 28 गुणांसह तिसऱया स्थानी आली. तेव्हा व्हेरोनिकालाही 28 गुण मिळाले होते. त्यामुळे ही एलिमिनेशन फेरी असल्यामुळे दोघांमध्ये शूट ऑफ झाले. ज्यात मनू हरली. तिचे पदकही हुकले.