निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने केलेल्या आरोपांचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड शब्दांत समाचार घेतला. सचिन वाझेमार्फत माझ्यावर आरोप होत आहेत. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे, असे प्रत्युत्तर अनिल देशमुख यांनी दिले.
अनिल देशमुख हे पीएमार्फत पैसे घ्यायचे. या संदर्भातील पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे, असा आरोप अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने माध्यमांशी बोलताना केला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली तर ईडीच्या कारवाईपासून सुटका करण्याची ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांना बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणला होता ही वस्तुस्थिती मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता सचिन वाझेने माझ्यावर जे आरोप केले, ही देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
वाझेच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही
सचिन वाझेने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नाव घेतले. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोणी सचिन वाझेला प्रवक्ता करीत असेल तर परिस्थिती आणखीन बिकट होईल. सचिन वाझे मला कधी भेटला नाही. त्याचा माझा कधी संबंध आला नाही. ज्याच्यावर गंभीर गुन्हे आहेत त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाझे विश्वासार्ह व्यक्ती नाही
सचिन वाझे हा विश्वास ठेवण्यालायक व्यक्ती नाही, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने मारलेले आहेत. आतापर्यंत दोन खुनाच्या गुह्यांत सचिन वाझेला अटक करण्यात आली. आताही एका खुनाच्या गुह्यात तो तुरुंगात आहे. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
त्यांचा बोलविता धनी कोण – लोंढे
अनिल देशमुख व श्याम मानव यांनी फडणवीसांचा बुरखा फाडल्यावर कैदेत असलेला सचिन वाझे अचानक कसा प्रकट झाला. त्याला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी दिली? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
आताच आरोप कसे? – सुळे
अनिल देशमुख यांच्यावर आताच आरोप का झाले या पत्राचे आणि आरोपांचे टायमिंग बघा. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आहेत. त्यामुळे हे आरोप केले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.