‘लाडकी बहीण’ अजूनही संभ्रमात; दीड हजाराऐवजी फक्त 1 रुपयाच मिळणार?

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र, सरकारच्या तिजोरीत खणखणाट असल्याने ही योजना जाहीर झाल्यापासून ही लागू कशी करणार असा प्रश्न विरोधक करत आहेत. तसेच विधानसभा निवडणूक होईपर्यंत या योजनेचे एखादा हप्ता देण्यात येईल, नंतर ही योजना थंड बस्त्यात जाईल, अशी शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली आहे. तसेच सत्तातील अनेकजण पैशांची चणचण असल्याने ही योजना पुढे कशी रेटायची, या संभ्रमात आहेत. या सर्व घडामोडींमुळे लाडक्या बहीणी आपल्याला या योजनेचे पैसे मिळतील का, या संभ्रमात आहेत.

ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यापासून ते विविध कागदपत्रे जमवण्यापासून बहिणींची फरफटच झाली आहे. त्यात आता महिलांना दीड हजाराऐवजी फक्त एक रुपयाच मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच मराठीतील अर्ज बाद होणार अशीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारने ही योजना जाहीर केली खरी, पण याचे पैसे हातात पडणार का, अशा संभ्रमात बहीणी आहेत.

सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांना जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तसेच याबाबत होत असलेल्या चर्चेमुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधींचे अर्ज सरकार दरबारी आले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू केल्याने अर्ज भरणाऱ्यांमध्ये वाढ होत जात आहे. परिणामी तितक्याच अडचणीही निर्माण झाल्या आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेसाठी मराठीतून केलेले अर्ज बाद केले जातील, अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मराठीतील अर्ज बाद केले जाणार नसल्याची स्पष्टोक्ती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहोत. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल, असेही आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.