निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून IRS अधिकाऱ्यावर गोळीबार, न्यायालयाच्या आवारातच सासऱ्याने जावयाला संपवले!

कौटुंबिक वादातून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयाच्या आवारातच आयआरएस अधिकारी असलेल्या जावयाची हत्या केल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. हरप्रीत सिंग असे हत्या करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. तर मलविंदर सिंग असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. चंदीगड न्यायालयातील मध्यस्थी केंद्राजवळ ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. आरोपीकडून बंदुकीसह तीन गोळ्या जप्त करण्यात आले आहे.

चंदीगडचे एसएसपी कंवरदीप कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 पासून मलविंदर सिंग यांच्या मुलीची घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. याचसंदर्भात आज चंदीगड न्यायालयातील मध्यस्थी केंद्रात चौथी बैठक होती. या बैठकीसाठी दोन्ही पक्ष हजर झाले होते.

मयत हरप्रीत सिंग हे नवी दिल्लीत कृषी मंत्रालयात कार्यरत आहेत. मध्यस्थ बैठकीसाठी ते आज आई-वडिलांसह न्यायालयात हजर झाले होते. मात्र दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या बाजूने उपस्थित असलेले माजी सहाय्यक पोलीस महानिरीक्षक मलविंदर सिंग यांनी जावयावर गोळ्या झाडल्या. हरप्रीत यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी मलविंदर सिंगवर हत्या आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.